मारहाण करून मोबाईल रोख रक्कम लुटल्याची तक्रार
आंबाेली (प्रतिनिधी) : बेळगाव येथे मासे विक्री करून आंबोली मार्गे सिंधुदुर्गात टेम्पोने येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीविक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल लुटल्याचा धक्कादायक प्रकार आंबोलीत घडला आहे. आंबोली घाटमार्गात गाडी अडवून तसेच चाकूचा धाक दाखवून मत्स्यव्यवसायिकांना लुटण्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. घाटात उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली तसेच आपल्याला मारहाण केली अशी तक्रार संबंधित व्यवसायिकांनी सावंतवाडी पोलिसात दाखल केली आहे. आंबोली घाटात भरदिवसा घडलेल्या लुटी च्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.