कणकवली (प्रतिनिधी) : भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृतीचे जतन या सर्वांमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्या साठी येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आठ विद्याशाखा निर्माण करण्यात आल्या असून अकरावी व बारावीला प्रत्येकी आठ विषय निवडता येतील. म्हणजेच बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर दिला जाईल. कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक शाखा असणार नाहीत. परीक्षा पद्धती, मूल्यमापन पद्धती, बोर्ड संरचना बदललेली असेल. देशातील अभ्यासक्रमासाठी प्रथमच अशी नाविन्यपूर्ण रचना तयार करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून येऊ घातलेली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना जाणून घेता येईल. कारण ज्ञानाच्या बाबतीत जग आणि आजचा विद्यार्थीही गतिमान झाला आहे. त्यामुळेच शासन नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी विचाराधीन आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्ते पर्यवेक्षक प्रा. ए .पी .चव्हाण यांनी केले.
कणकवली कॉलेज कनिष्ठ विभागामार्फत नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी जागृती सप्ताह निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्ष प्रा. ए.पी. चव्हाण, व्यावसायिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय सावंत, प्रा. विजयकुमार सावंत, तंत्र सहाय्यक सानिका राणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्रा. हरिभाऊ भिसे म्हणाले- नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी संदर्भात समाजात व विद्यार्थ्यांत जनजागृती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी उंचावलेली आहे. तसेच विविध व्यावसायिक शिक्षणाबरोबरच प्रादेशिक भाषेतूनही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वाव मिळाला पाहिजे. पुढील शिक्षणासाठी जाण्यापूर्वी पायाभूत शिक्षण भक्कम झाले पाहिजे त्यासाठी बालवाडी पासूनच मुलांचा पाया भक्कम झाला पाहिजे. पीपीटी सादरीकरणाच्या सत्रामध्ये प्रा. ए. पी. चव्हाण यांनी शिक्षण धोरणाची तत्वे, शैक्षणिक संरचना, आराखडा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. नवीन अध्यापन शास्त्रीय स्तर वर्ग व वय निहाय समजावून सांगितला. यावेळी विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल तसेच इयत्ता बारावी नंतर गुणवत्तेप्रमाणे प्रवेश मिळेल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एस. एस. वाळके, प्रा. एम. व्ही. महाडेश्वर, प्रा. माधुरी राणे, प्रा. नेहा घोणे शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. 24 पासून जागृती सप्ताह निमित्ताने निबंध, वक्तृत्व, पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा आयोजन केले होते. उपस्थितांचे स्वागत प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विजय सावंत यांनी मानले.