खड्डेमुक्त रस्ता दाखवा….1 हजार मिळवा

मनसे सरचिटणीस उपरकर यांची घोषणा

कणकवली(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोन्ही मंत्री जिल्हा विकासात अपयशी ठरले आहेत.जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ता दाखवा आणि 1 हजार रु बक्षीस मिळवा अशी उपरोधिक घोषणा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.बांधकाममंत्री चव्हाण हे सावंतवाडी कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर अद्याप तेथे नवीन कार्यकारी अभियंता देऊ शकले नाहीत. एकीकडे आपत्ती स्थितीत मुख्यमंत्री वारंवार निर्देश देत असताना कार्यकारी अभियंत्याअभावी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यांची डागडुजी कशी होणार ? . जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एकाही उपअभियंत्याने दायित्व काळात एकाही ठेकेदाराला रस्ते दुरुस्तीबाबत नोटीस काढलेली नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये अशी तंबी दिली. मात्र त्याला केराची टोपली अधिकारी दाखवत पावसाच्या काळात जिल्ह्याबाहेर जात आहेत. कुडाळ पं स च्या माणगाव येथे आयोजित चिखलधुणी कार्यक्रमाला गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्ते नादुरुस्ती ची पाहणी करण्याचे मात्र टाळले. शिक्षणमंत्री केसरकर हेही निष्क्रिय ठरले आहेत.सिंधुदुर्गात शाळा सुरू होऊन दीड महिना होऊनही अद्याप शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. आपल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या घोषणाही मंत्री केसरकर पूर्ण करू शकले नाहीत. जिल्ह्याचे रहिवासी असलेले दोन्ही मंत्री जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत. आमदार वैभव नाईक हे मंत्र्यांना विकासकामांची निवेदने देऊन ती कामे मंजूर झाल्याचे भासवतात. जिल्ह्यातील खासदार असो अथवा आमदार अथवा मंत्री, सर्वांनीच जनतेची फसवणुक केली असून याबाबत मनसे आवाज उठवणार असल्याचे उपरकर म्हणाले.

error: Content is protected !!