ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सत्कार
कणकवली (प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ज्येष्ठांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नागरिक दिनी ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा संघाचा उपक्रम अतुलनीय आहे. आजच्या तरुण पिढीने ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांचा गौरव कार्यक्रम येथील एचपीसीएल सभागृहात पार पडला. याप्रसंगी पारकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. विद्याधर तायशेटे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, रोटरी क्लब, कणकवलीचे अध्यक्ष रबी परब, दादा कुडतरकर, डॉ. संदीप साळुंखे, प्रवासी संघाचे सचिव सी. आर. चव्हाण, संजय मालंडकर, विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते. पारकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ समाजाच्या हितासाठी काम करीत आहे. ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांचे अनुभव जाणून घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे ज्येष्ठांची काही स्वप्ने असतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य केले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हा ज्येष्ठांच्या हितासाठी काम करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, भालचंद्र खोत आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मानचिन्ह, पत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवर व सत्कारमुर्तीनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रोटरी क्लब व डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली एस. टी. आगारास व्हीलचेअर देण्यात आली असून त्याचाही लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय खडपकर यांनी केले. आभार प्रमोद लिमये यांनी मानले.