जिल्हा बँक, जिल्हा परिषद – गोकुळ- भगीरथ प्रतिष्ठान मध्ये सामंजस्य करार पूर्ण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या श्वेत क्रांतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या शाश्र्वत विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्या तीन सामंजस्य करार आज करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी स्वाक्षरी करीत यावर शिक्कामोर्तब केले. कुत्रिम रेतन देवदाता निर्माण करणे, आदर्श गोठा बांधणी आणि बायोगॅस बांधणी यासाठी हा करार करण्यात आला आहे. अशाप्रकारे प्रशासन, सहकारी बँक, सहकारी संस्था एकत्र येवून काम करण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे बँक अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.
जिल्हा बँक प्रधान कार्यालयात पार पडलेल्या करार कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रभारी कृषी अधिकारी विनायक ठाकूर, प्रभारी जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, निता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, विद्याधर परब, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, बँक कर्मचारी मंदार चव्हाण आदी उपस्थित होते. बँक अध्यक्ष दळवी यांनी प्रशासक नायर यांचे स्वागत केले. डॉ देवधर व प्रमोद गावडे यांनी सामंजस्य करार बाबत माहिती दिली.