कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे
श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. 12 व्या शतकात हे मंदिर प्रथम उभारण्याचा शिलालेख आहे. यावरुन हे देवस्थान सुमारे एक हजार वर्षे पूरातत्व असण्याचे मानले जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी या श्री स्वयंभूची आराधना केल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरात असलेली विहीर ही पांडवकालीन असण्याचे ग्रामस्थ सांगतात.
अशा या इतिहास कालीन मंदिरात हरिनाम सप्ताहनिमित्त रविवार 12 रोजी स. 10 वा घटस्थापना कार्य होणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस मंदिरात दररोज भजने, दिंड्या, चित्ररथ, पालखी, हरिपाठ आदी कार्यक्रम होणार आहेत. रविवार 19 फेब्रुवारी रोजी घटविसर्जन व समराधना होणार आहे. या हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन दिगवळे ग्रामस्थांनी केले आहे.