शिवसेनेला निष्ठेच्या गोष्टी सांगणार्यांना धडा शिकवा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते अन्य ठिकाणी जावून आता शिवसेनेलाच निष्ठेच्या गोष्टी शिकवत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य तो धडा शिकविण्यासाठी सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकावचा आहे. त्यामुळे आता अधिकचा लक्ष सावंतवाडीत देणार, असे अभिवचन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिले.
दरम्यान सत्तेच्या जोरावर माझ्या मागे ईडी लावून तसेच काही शिवसैनिकांना आमिषे दाखवून आणि काहीना धमक्या देवून त्यांचे पक्ष प्रवेश घेतले जात आहेत. परंतु काही झाले तरी शिवसेना संपणार नाही. हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे, असे त्यांनी सांगितले, निरवडे येथील सुमारे साडे सहाशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. नाईक बोलत होते. यावेळी ते म्हणाले, काही झाले आणि कोणी सांगितले तरी शिवसेना संपणार नाही तर जोमाने वाढणार आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढला आहे. त्याच्या जोरावर अनेकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र काही झाले तरी ते त्यात यशस्वी होणार नाहीत. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत सुध्दा पुन्हा विनायक राऊत हेच बहुमतांनी विजयी होतील, असा एक सर्व्हे पुढे आला आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तेच राजकारणातून हद्दपार होतील, असे ही नाईक म्हणाले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, विधानसभा समन्वयक अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, राजू नाईक, दोडामार्गचे बाबुराव धुरी, शब्बीर मणियर, राजू मुळीक, आबा सावंत, राजू मुळीक, सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, संजय तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते