सावंतवाडी (प्रतिनिधी) : आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तर अध्यक्ष म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी गिवर्गिस मार कुरीलोस, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, चराठा सरपंच प्रचिती कुबल, सावंतवाडीचे पॅरिस प्रिस्ट फादर मिलेट डिसोजा, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कुमार ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संस्थेच्यावतीने अतिदुर्गम भागातील घारपी, असनिये, तांबोळी, भालावल, कोनशी, दाभिल, सरमळे या गावात प्रत्येक आठवड्यात दोन दिवस फिरते वैद्यकीय पथक जाऊन वैद्यकीय डॉक्टर मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना मोफत उपचार करून औषधे देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.