मालगुंड (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन २०२२ – २३ साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार, विशेष सात पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी प्रथम श्रेणीच्या पुरस्कारासाठी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे. यामध्ये प्रथम श्रेणी पुरस्कारात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कविता संग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट – नाट्य – विषयक पुरस्कार यांचा समावेश आहे. तर सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा – कारवार – बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाणार आहे. विशेष पुरस्कारदेखील लेखनाच्या सात प्रकारात दिले जाणार असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाड्मय, संकीर्ण गद्य, नाटक – एकांकिका, वैचारिक यांचा समावेश आहे. यामध्ये वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथा संग्रह पुरस्कार, वसंत सावंत कविता संग्रह पुरस्कार, श्रीकांत शेटे चरित्र – आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर बालवाङमय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङमय पुरस्कार, अरुण आठवले संकीर्ण वाङमय पुरस्कार, रमेश कीर नाटक – एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार या पुरस्काराचा समावेश आहे. पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ जानेवारी २०२४ पूर्वी केंद्रीय कार्यवाह, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड ता. जि. रत्नागिरी – ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३० यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या पुरस्कारासाठी लेखक, कवी हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) या परिसरातील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सभासद असणे आवश्यक असून, तशा प्रकारचे कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङमय प्रकाराचा स्पष्ट निर्देश लेखकाने पुरस्कारासोबत करावयाचा आहे. वरील पुरस्कारासाठी पुस्तके ही १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत.
तरी या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त सभासदांनी पुस्तके पाठविण्याचे आवाहन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, पुरस्कार समितीचे प्रमुख प्रा. अशोक ठाकूर यांनी केले आहे.