कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ बाबतचा निर्णय सन 2024 पूर्वी घेऊ -पालकमंत्री दीपक केसरकर

हद्दवाढ बाबत मुख्यमंत्री यांच्याकडे एका महिन्याच्या आत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार

कोल्हापूर : (रोहन भिऊंगडे) कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ बाबतचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हद्दवाढच्या बाजूने असलेले व हद्दवाढच्या विरोधी असलेल्या नागरिकांशी समन्वय ठेवून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबतचा निर्णय सन 2024 पूर्वी घेण्याची ग्वाही शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ बाबतच्या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह हद्दवाढच्या बाजूने असलेले व हद्दवाढच्या विरोधी असलेले नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी बाबत एका महिन्याच्या आत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे स्वतंत्र मीटिंग घेण्यात येणार असून यासाठी हद्दवाढ बाजूने असलेले नागरिकांचे प्रतिनिधी तसेच विरोधी बाजूने असलेल्या नागरिकांचे प्रतिनिधी यांनाही बोलवण्यात येईल. हद्दवाढीचा हा प्रश्न शासनाकडून सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील व सन 2024 पूर्वी शासन याबाबत निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी आपण भेटी दिल्या असून शहराच्या काही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणेच हदवाढ करण्यात येणाऱ्या ग्रामीण भागालाही आपण भेटी देणार असून त्यांच्याही समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाला मिळणारा निधीही अत्यंत कमी असून हा निधी वाढवून या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा प्राधिकरणामार्फत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व विरोधी समिती यांच्यामध्ये चांगली वातावरण निर्मिती करुन समापोचराने मार्ग काढून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हद्दवाढ बाबत अंतिम निर्णय हा पूर्णपणे शासनाचा असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर शहरातील नागरिक व प्राधिकरणातील, ग्रामीण भागातील नागरिक यामध्ये योग्य तो समन्वय असला पाहिजे. तसेच हद्दवाढीच्या अनुषंगाने प्राधिकरणातील ग्रामीण भागांची स्वतंत्र बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकल्या गेल्या पाहिजेत. तसेच हद्दवाढी बाबत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांत कोणत्याही प्रकारचा संघर्ष न होता हा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. शहराचे क्षेत्रफळ खूप कमी असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी केली. तर शहरी व ग्रामीण भागातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी स्वतंत्र बैठका घ्याव्यात. सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावावा, असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.

हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ नये व ग्रामीण भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागात चांगल्या पायाभूत सुविधा देत असल्याचे सांगितले तर हद्दवाढ कृती समितीच्या काही सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कोल्हापूर शहराचे क्षेत्रफळ खूप कमी असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यासह अन्य इतर बाबींची माहिती देऊन हद्दवाढ झाली पाहिजे या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली.
यावेळी नारायण पवार, डॉ. सुभाष पाटील, सचिन चौगुले, रसिका पाटील यांनी हद्दवाढ होऊ नये याबाबत आपली मते व्यक्त केली. तर ॲड. बाबा इंदुलकर, पवार, सुनील कदम,आदील फारस आदींनी हद्दवाढ झाली पाहिजे या अनुषंगाने मते व्यक्त केली. राजकीय पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच क्रेडाईचे प्रतिनिधी यांनी ही त्यांची मते व्यक्त केली.

प्रारंभी कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून ते महानगरपालिकेत रूपांतर होणे व हद्दवाढीच्या अनुषंगाने विविध टप्प्याची माहिती सादरीकरणाद्वारे बैठकीत देण्यात आली. शासनाने 16 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मागणी केलेल्या एकूण 42 गावांचा समावेश करून कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित केलेले असून त्यानुसार कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत कोल्हापूर शहराचे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर आहे तर प्रस्तावित हद्दवाढ सामील गावाचे क्षेत्र 122.42 चौरस किलोमीटर आहे हद्दवाडीनंतर महानगरपालिकेचे क्षेत्र 189.24 चौरस किलोमीटर इतके होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!