सावडाव मधील घटनेचा पोलिसांनी केला पर्दाफाश
पालकांनो अजिबात घाबरू नका… तुमची शालेय मुले सुरक्षित आहेत… पोलिसांनी दिला जनतेला विश्वास
कणकवली (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणाऱ्या सावडाव येथील शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणातील गूढ अखेर उलगडले असून त्याचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांनी केलेल्या तपासात घटनाक्रम व पुरावे पाहिल्यानंतर पोलिसांनी हे कोडे उलगडले. तो अपहरणाचा प्रकार अखेर विद्यार्थ्यांनीच केलेला बनाव असल्याचे पोलीस तपासाअंती सिद्ध झाले आहे. शाळेत सांगितलेली प्रार्थना पाठ न झाल्याने हा बनाव रचल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले आहे. तसेच तुमची मुले सुरक्षित आहेत पालकांनो अजिबात घाबरू नका, असा विश्वासही पोलिसांनी जनतेला दिला आहे.
१३ फेब्रुवारी रोजी सावडाव शाळेतील सहा मुलांना एका वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे आणि त्यांच्या तावडीतून आपण पळून आल्याचे संबंधित मुलांनी सांगितले होते. या नंतर जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांसह इतर प्रशासनही कामाला लागले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावडाव येथे भेट दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी याबाबत कसून तपास केला. त्यासाठी सावडावकडे जाणाऱ्या मार्गावरील शक्य होतील तेवढे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले होते. मात्र त्या दरम्यान सावडावकडे जाणारे कोणतेही संशयित वाहन आढळले नव्हते. पोलिसांनी तांत्रिक अंगाच्यादृष्टीनेही तपास केला. विद्यार्थी ज्या ठिकाणी घटना घडल्याचे सांगत होते, तेथील व इतर ठिकाणच्याही पाऊलखुणाही तपासण्यात आल्या. विद्यार्थी सांगत असलेली घटना व क्रम याचाही ताळमेळ लागत नव्हता. अखेर पोलिसांनी खोलवर जाऊन चौकशी केली असता सदरच्या मुलांना शाळेत एक प्रार्थना पाठ करण्यासाठी शिक्षकांनी सांगितली होती. मात्र प्रार्थना पाठ न झाल्याने आपल्याला ओरडतील इतर विद्यार्थ्यांसमोर आपला कमीपणा होईल, या भीतीने या मुलांनी हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात पुढे आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या तपासात पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुपकुमार खडे, कृष्णा केसरकर, तसेच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व कणकवली पोलीसही यात सहभागी झाले होते.