सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागासह राज्यात आघाडी कायम राखली असून आतापर्यन्त ६१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ०९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ४ लाख ७९६ हजार जणांनी आयुष्मान कार्ड काढले आहे.तर अद्यापही २ लाख ६१ हजार १४९ लाभार्थिन्चे (३९ टक्के ) कार्ड काढणे बाकी असून हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्वकांशी आरोग्य विमा योजना असून, या योजनेच्या लाभार्थीला एकूण ५ लाखाचा आरोग्य विमा मोफत दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ६४ हजार ०९४ एवढे लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. सरकारने ही योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी सुरू केली आहे. आदिवासी एससी, एसटी, बेघर, निराधार, किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती, इत्यादीसाठी ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून, एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबापैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना, २०११च्या यादीतील एसईसीसी डाटाबेसनुसार लाभार्थी निवडले गेले आहेत.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी आयुष्मान भव योजनेचे ई-कार्ड मिळवण्यासाठी जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र वा योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे तसेच रेशन दुकानात जाऊंन कार्ड काढावे तेथे ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी स्वतः लाभार्थी, ओरिजिनल रेशन कार्ड, आधार कार्ड, लिक असलेला मोबाइलची आवश्यकता आहे. सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळावा. लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून योजनेत अंगिकृत असलेल्या रुग्णालयाद्वारे आणि आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ग्रामीण आणि शहरी भागात मोफत कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने आयुष्यमान कार्ड योजनेच्या कामात आघाडी कायम ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आत्तापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झाले असून कोल्हापुर ५७ टक्के, ठाणे ५१ तर अन्य जिल्ह्याचे काम ५० टक्केहुन कमी आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची आघाडी कायम ठेवण्यासाठी तसेच १०० टक्के उदिस्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक,आरोग्यसेविका, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक लाभार्थीचे आयुष्यमान कार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजही ज्या लाभर्थिनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड काढलेले नाही अशा लाभार्थीने शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन आपले कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आयुष्यमान कार्ड योजनेचे काही पात्र लाभार्थी जिल्हाबाहेर वास्तव्यास आहेत .असे दिसून आले आहे. यामुळे उदिस्ट पूर्ण करताना अड़चण येत आहे .तरी अश्या पात्र लाभार्थीनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधुन आपली आयुष्यमान कार्ड काढून घ्यावीत.