देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या चिन्हाचे अनावरण आणि मराठी भाषादिन याचे औचित्य साधून ग्रामपंचायत विजयदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवकालिन कवी ब्रिजभूषण यांच्या सिद्धहस्तातून छत्रपती शिवरायांवर आधारीत ‘शिवराजभूषण’ या काव्यसंग्रहातील काही छंद आणि त्यांचे अर्थ किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे माजी अध्यक्ष मालवणचे कवी भूषण साटम यांनी उलगडले.
यावेळी विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाझ काझी, सदस्य सिद्धेश डोंगरे, सदस्य शुभा कदम, वैशाली बांदकर – कीर, प्रतिक्षा मिठबांवकर, माजी सरपंच प्रसाद देवघर, बाळा कदम, माजी उपसरपंच प्रदीप साखरकर, महेश बिडये, शरद डोंगर, यशपाल जैतापकर इत्यादींसह आरमाचे अध्यक्ष सनिल बासरानी सचिव संजय चिपळूणकर, खजिनदार राजाराम शिंदे यांच्यासह आसमाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या चिन्हाचे अनावरण आणि मराठी भाषादिन याचे औचित्य साधून ग्रामपंचायत विजयदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अॅड एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र (आसमा) च्या पदाधिकाऱ्यांसहीत सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत किल्ले विजयदुर्गच्या सदरेत हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
आरमारी किल्ल्यांच्या शृंखलेंमधील अतिमहत्वाच्या व असंख्य तोफगोळ्यांचे वार झेललेल्या किल्ले विजयदुर्गच्या साक्षीने पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्वच भारावून गेले होते.
कवी भूषण यानी छत्रपती शिवरायांवर लिहिलेले ५९८६. छंद आणि १०५ अलंकार यांनी शब्दबद्ध केलेला शिवराजभूषण काव्यसंग्रह म्हणजे शिवाजी महाराजांची बुद्धिमता, चातुर्य, औदार्य, युद्धनिती, एकोपा या व अशा अनेक स्वभाव वैशिष्ट्यांचा एक खजिनाच जणू हा काव्यसंग्रह ब्रिजभाषेत असून त्यातील छंद मुखोद्गत सादर करणे आणि त्याचे सोप्या भाषेत विवेचन करणे यातून भूषण साटम यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिवराजभूषण काव्यसंग्रहातील काही मोजक्या छंद आणि अलंकारांचे सादरीकरण सुमारे १ तासांच्या आयोजित कार्यक्रमात करण्यात आले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कविता तळेकर यांनी लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे गायन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव परुळेकर यांनी केले, तर आभार ग्रा. पं. सदस्या पूर्वा लॉबर त्यांनी मानले.