खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल , सोमस्त अकॅडमी कणकवली व सिंधू गर्जना ढोल ताशा पथक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कणकवली वरवडे येथे विश्वविक्रमाचे आयोजन केले होते. यात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
या विश्वविक्रमामध्ये भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी मानवाकृती साकारली व सुमारे 450 कलाकारांनी हार्मोनियम ,तबला, पखवाज, गायन, संबळ, ढोल, ताशा यांच्या माध्यमातून आपली कलाकृती सादर केली. व विश्वविक्रमाला गवसणी घातली. यात खारेपाटण हायस्कूलचे सुमारे 35 विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. याबद्दल आयोजकांनी खारेपाटण हायस्कूलचे विशेष सन्मान चिन्ह देऊन आभार मानले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, संगीत शिक्षक श्री पेंडूरकर व इतर शिक्षक उपस्थित होते. संगीत संयोजनात सहकार्य केल्याबद्दल खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री.पेंडुरकर,श्री.हरयाण,धनंजय मोसमकर यांचा सत्कार करण्यात आला.या विश्वविक्रमी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे ,सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर, खारेपाटण सरपंच सौ ईस्वलकर मॅडम तसेच मालंडकर मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री फराकटे,श्री वारंगे, श्री गुरसाळे, पत्रकार संतोष पाटणकर, श्री आत्तार या सर्वांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.