तात्काळ कार्यवाही न झाल्यास मोर्चा काढण्याचा संतप्त शेतकऱ्यांचा इशारा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोलीत वन्य प्राण्यांचा हैदोस माजला असून नांगरतासवाडी येथील अशोक सखाराम गावडे यांच्या ४ एकर उसशेतीचे आणि १ एकर मक्याचे गवारेड्यांनी नुकसान केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान केले जात आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक बनले असून तात्काळ कार्यवाही न केल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आंबोली परिसरात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. त्यात अशोक गावडे या शेतकऱ्याच्या चार एकर ऊस शेतीचे आणि एक एकर मक्याचे नुकसान गव्यांकडून झाले आहे. तर चंद्रकांत पाताडे यांच्याही ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वनविभाग केवळ तात्पुरते पंचनामे करून कागद रंगविण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली जात नाही. आंबोलीत मोठ्या प्रमाणात गव्यांची आणि माकडांची आणि वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. मात्र वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वनखात्यावर संताप व्यक्त केला असून आता तात्काळ कार्यवाही ना झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.