वैभववाडी (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी भुईबावडा घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंत कोसळली होती. निकृष्ट कामामुळे भिंत कोसळल्याचा आरोप उबाठा सेनेकडून करण्यात आला होता. या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसल्याचा अहवाल देणा-या बांधकाम विभागाविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक झाली.शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवुन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.अहवाल देणारे अधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी तोंडसुख घेतले.तसेच २६ जुलैला उपअभियंत्यानी कार्यालयात हजर राहावे अन्यथा कार्यालयाला कुलुप घालणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भुईबावडा घाटरस्त्यातील संरक्षक भिंत आठ दहा दिवसांपुर्वी कोसळली.या भिंतीचे काम निकृष्ट असल्यामुळे ती कोसळल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासुन सुरू आहे.याशिवाय खारेपाटण-गगनबावडा महामार्गावर झालेली कामे देखील निकृष्टच असल्याचा आरोप सुरू आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी यांनी कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे काम दर्जेदार झालेले होते असा अहवाल वरिष्ठांना दिला.त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले.ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नंदु शिंदे,मंगेश लोके,रजब रमदूल,लक्ष्मण रावराणे,स्वप्निल धुरी,जितेंद्र तळेकर,शिवाजी राणे,मनोज सावंत,नलिनी पाटील यासह विविध कार्यकर्ते बांधकामच्या उपअभियंत्याना जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेले.परंतु तेथे नसल्यामुळे कार्यकर्त्याचा राग अनावर झाला.त्यांनी.तेथे उपस्थित असलेले बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश सुतार यांनाच धारेवर धरण्यास सुरूवात केली.काम दर्जेदार होता तर भिंत कोसळली का अशी विचारणा त्यांनी केली.खोटा अहवाल देवुन ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न अधिकारी करीत असल्याचा आरोप श्री.रावराणे यांनी केला.या घाटरस्त्यांमध्ये जर अनुचित प्रकार घडला तर आम्ही अधिकाऱ्यांना सोडणार नाही.श्री.जोशी यांना आज कार्यालयात येणार यांची कल्पना दिली होती तरी देखील ते आले नाही.आम्ही पुन्हा २६ जुलैला पुन्हा कार्यालयात श्री.जोशीच्या भेटीसाठी येणार आहोत.जर ते त्यावेळी अनुपस्थित राहीले तर कार्यालयाला कुलुप ठोकु असा इशारा कार्यकर्त्यानी दिला आहे.