मुंबई (ब्यूरो न्यूज) : विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. पण कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे.
मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील. बाळा नांदगावर हे पक्षाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ते शिवडी विधानसभेचे माजी आमदारदेखील राहिले आहेत. शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करत बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवला होता.