बिळवस गावचा कलाऊपासक चित्रकार !  

सचिन पालव यांच्या  १.९×१ इंचाच्या रांगोळीची ‘इंडिया ग्लोबल गोल्डन टॅलेंट बूक ऑफ रेकॉर्ड कडून दखल 

जागतिक स्तरावर एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित 

मसूरे (प्रतिनिधी) : कोकण ही कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते. या मातीने अनेक कलाकार या भारत देशाला दिले आहेत. मुळात कोणतीही कला ही उपजत असावी लागते. मग त्यात आणखी सरावाने सुधारणा होऊन अस्सल कलाकृती समजापुढे येतात. मालवण तालुक्यातील बिळवस गावचे सुपुत्र असलेले सचिन लवू पालव हे असच एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व. रांगोळी असुदे किंवा तैलचित्र किंवा कॅनवास ऑइल पेंटिंग सर्वच ठिकाणी आपली छाप उमटवतात ते सचिन पालव. मुंबई उच्च न्यायालय येथे ‘कक्ष अधिकारी’ ह्या पदावर कार्यरत असणाऱ्या या कलाउपासकाला  आजवर अनेक पुरस्कार व अवार्ड मिळाले आहेत.       

मुंबई मधील लोअर परळ येथे त्याचे बालपण गेलं. शालेय जीवना पासूनच चित्रकला आणि रांगोळीची आवड होती. १९८८ साली म्युनिसिपल शाळेमध्ये इ. सातवीत असताना  त्यांनी चित्रकले मध्ये प्रथम क्रमांक आणि प्रमाणपत्र (रु.१५/-बक्षीस)  तसेच दहावीला हस्ताक्षर आणि रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.वडिल गिरणी कामगार होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वडीलांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळें सचिन यांनी दिवसा नोकरी आणि रात्री काॅलेज करून बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले. 

20 व्या वर्षी नोकरीला सुरवात 

 वयाच्या २० व्या वर्षी मा. मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदावर रुजू झाल्या नंतर सुद्धा त्यांनी आपली चित्रकला आणि रांगोळीची कला जोपासली. मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीची भव्य रांगोळी त्यांनी साकारली आणि त्या रांगोळीच्या छायाचित्राने  मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनदर्शिकेवर (२०१२)  मानाचं स्थान प्राप्त केलं होते हे आपले पहिले यश असल्याचे पालव सांगतात. 

कोरोना महामारीच्या लॉक डाऊन परिस्थिती मध्ये घराबाहेर पडायचं नाही म्हणून त्यांची मोठी कन्या सानिका हिने पुढाकार घेऊन घरात राहूनच कलेत रमायचं असं सांगितलं व तिला छोटी बहीण स्नेहा हिने दुजोरा दिला. त्याच काळात खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेची प्रगती होत गेली. 

जागतिक स्तरावर एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित 

ह्याच काळात सचिनला जागतिक ऑनलाईन स्पर्धेमध्ये कला रत्नम फाऊंडेशन ऑफ आर्ट सोसायटी, बरेली, उत्तप्रदेश तर्फे जागतिक स्तरावर एक्सेलन्स अवॉर्ड आणि सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तसेच  त्यांनी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा ऑनलाईन स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसांची कमाई केली.

ह्या व्यतिरिक्त त्यांनी  2011 पासून जिल्हास्तरीय रांगोळी, चित्रकला स्पर्धेत  घवघवीत यश मिळवलं. राजा रवी वर्मा कलापीठ (बाल गंधर्व चित्र प्रदर्शन कलादालन पुणे) तसेच कोहिनूर चित्र प्रदर्शन कला दालन, अंधेरी, मुंबई यांच्या सौजन्याने अनुक्रमे 2019,2020 मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

थ्रीडी रांगोळी सह  कॅनव्हास ऑईल पेंटिंग मध्ये माहीर 

२०२२ ला आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरी काढलेल्या १.९×१ इंचाच्या रांगोळीची’इंडिया ग्लोबल गोल्डन टॅलेंट बूक ऑफ रेकॉर्डने दखल घेऊन त्यांना गौरविले होते. पालव यांच्या शिवराज्याभिषेक, लालबागचा राजा गणपती, सुभाषचंद्र बोस यांच्या रांगोळ्या विशेष गाजल्या. नामांकित व्यक्तींच्या रांगोळ्यां मध्ये मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, डाॅ. प्रकाश आमटे, अभिनेता प्रशांत दामले यांचा समावेश आहे. त्यांनी  थ्रीडी रांगोळीचा सूद्धा प्रयोग केला. 

कॅनव्हास ऑईल पेंटिंग मध्ये समाज सेविका सिंधुताई सकपाळ, श्री दत्त महाराज, सातेरी देवी यांच्या ऑईल पेंटिंग्ज साकारल्या आहेत.

शास्त्रोक्त प्रशिक्षणा शिवाय यशस्वी 

कोणत्याही प्रकारचे शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेता केवळ सराव आणि कठोर परिश्रम तसेच कलेवर असलेलं निस्सीम प्रेम यामुळेच ही कलाकृती साध्य होते असं त्यांचं मत आहे. सचिन पालव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा कृपाशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत अशा भावना व्यक्त केल्या. कलाकार हा नेहमी शांत राहून आपल्या कलेची  उपासना करत असतो. सचिन पालव हे सुद्धा आपल्या कलेचा कोणताही बडेजाव न दाखवता समाजभान जपत कला क्षेत्रात वावरत आहेत. भविष्यात आणखी दर्जेदार कलाकृती त्यांच्या हातातुन  साकारतील यात शंका नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!