कृषी सहाय्यकांची बाधित क्षेत्राला भेट ; शेतकऱ्यांना फवारणी करण्याचा सल्ला
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने, पाणथळ भात शेती असलेल्या भागात “करपा” रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे फोंडाघाटसह घोणसरी, लोरे,परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी सहाय्यकांनी बाधित क्षेत्राला तातडीने भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना करपा रोगावरील कीटकनाशके- बुरशीनाशके यांचा योग्य प्रमाणात वापर करून फवारणी करण्याची शिफारस केली आहे.
या रोगामध्ये भाताच्या प्रत्येक आव्या मध्ये दोन- चार पाती पिवळी-लाल होऊन,त्याचा किडा रोपाच्या तळाशी राहून अन्न रस शोषून घेतो. हा रोग पसरणारा असल्याने सुरुवातीलाच सायपरमेथ्रीन, कारबेंडिझाईन, मोनो युरिया योग्य प्रमाणात पंधरा दिवसाच्या फरकाने फवारणी केल्यास, आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने फवारणी करून रोग आटोक्यात आणावा, आपले नुकसान टाळावे असे आवाहन कृषी सहाय्यकांनी केले आहे. सदर रोगाची नोंद तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.