ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे वेधले लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे कणकवली नगरपंचायतीच्या नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर सर्व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्हयातील अत्यंत महत्त्वाचे गजबजलेले मध्यवर्ती शहर आहे. या शहरात येणाऱ्या जाणाऱ्या विविध व्यापारी वर्गाचे, नागरिकांचे, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरामध्ये सध्या या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने कणकवली शहरात डास निर्मुलन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊन साथीचे रोग मोठया प्रमाणात पसरण्याचा संभव आहे.
तसेच कणकवली शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याला गटार आहे की रस्ते गटारात आहेत याचा उलगडा होत नाही. कारण पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहात असते. शहरातील ठरावीक वॉर्डांमध्येच स्वच्छता मोहिम राबविली जाते. परंतु शहरातील काही भागातील अन्य वॉर्डांमध्ये स्वच्छतेच्या नावाने बोबाबोंब आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागामध्ये साथीचे रोग पसरण्याची जास्त शक्यता आहे. श्रीधर नाईक चौक ते रेल्वे स्टेशन रोडला असलेला फूटपाथ मृत्यूचा सापळा बनला आहे. फूटपाथवर मोठमोठी भगदाडे पडल्याने पादच्याऱ्यांना फूटपाथवरून चालणे जिकीरीचे झाले आहे. शहरातील रस्त्यावरील काही भागातील स्ट्रीट लाईट बंदा अवस्थेत आहेत. शहरातील रस्त्यांच्या कडेने मोठया प्रमाणात गवत वाढलेले आहे. गवत वाढल्यामुळे रस्ता समजून येत नाही. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांची देखिल भिती संभवते. शहरात सर्व्हिस रोडवरती आणि बाजारपेठेत अवास्तव वाहनांचे पार्किंग केले जाते. त्याकडे लक्ष देऊन बेजबाबदार वाहने रस्त्यांवर उभी करणाऱ्या वाहन चालकांवरती नगर पंचायत व पोलीस यंत्रणेमार्फत संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जेणे करुन वाहन चालक शिस्तबध्द वाहने उभी करतील व येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही.
शहरात विविध ठिकाणी शुलभ शौचालये बांधण्यात यावीत. विशेषत: बाजारपेठेत येणाऱ्या महिला आणि पुरुष ग्राहकांना समस्येला सामोरे जावे लागते. ती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. श्रीधर नाईक चौकातील आमदार नितेश राणे यांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या बस थांब्यामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी सदर बस थांबा परिसराची आठ स्वच्छता करण्यात यावी. तसेच शहरात अन्य ठिकाणी बांधलेल्या बसथांब्यांचीही स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच शहरातील अनेक भागात मोकाट गुरे व कुत्रे फिरत असतात त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे अपघातही होत असतात.
वरील सर्व समस्यांचे निराकरण तातडीने गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी स्वत: जातीनिशी सर्वेक्षण करावे व योग्य ती कार्यवाही तातडीने करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी व स्वच्छ व सुंदर कणकवली ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्यात यावी अशा प्रकारची आग्रही मागणी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.
यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शहरातील समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही ह्यूमन राईट असोसिएशनच्या शिष्टमंडळास याप्रसंगी दिली. याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका अध्यक्षा संजना सदडेकर, संघटक मंगेश चव्हाण, सदस्य भरत तळवडेकर, श्री. व सौ.भोसले. उपस्थित होते. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सिंधुदर्ग यांना माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.