कणकवली (प्रतिनिधी) : सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान, कणकवलीच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२४ जि प शाळा साळशी नं १ येथील सहाय्यक शिक्षिका स्मिता कोदले यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून रोख रक्कम 5 हजार , स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी पवार आणि सचिव डॉ सतीश पवार यांनी दिली.
सन २०२१ पासून दरवर्षी सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक सदाशिव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्मिता कोदले ह्या गेली सात वर्षे देवगड तालुक्यातील जि प साळशी नं १ येथे कार्यरत आहेत . त्यांचं शिक्षण एम ए डी एड, बी एड पदवीधारक आहे. ह्या अल्पकार्यकाळात साळशी सारख्या ग्रामीण भागात त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तरदायित्व खूप जबाबदारीने पेलले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुरत्न टॅलेंट सर्च, ए पी जे अब्दुल कलाम परीक्षा, ऑलिम्पियाड, मंथन, इंडियन टॅलेंट सर्च, डॉट कॉम असोसिएशन अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी मेहनतपूर्वक गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार केले. केवळ जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीसाठी यातील अनेक विद्यार्थी अव्वल क्रमांकाने पात्र ठरले. श्रीम स्मिता कोदले यांच्या नेमक्या मार्गदर्शनामुळे साळशी सारख्या अत्यंत ग्रामीण भागातील एक विद्यार्थिनी इस्रोला जायचं स्वप्न साकार करू शकली आहे.
यासोबतच शालेय क्रीडा स्पर्धा, चित्रकला, इंग्रजी स्पेलिंग पाठांतर, वक्तृत्व – निबंध स्पर्धा यांसारख्या सर्वांगीण विकास करणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तर – जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. स्मिता कोदले एक शिष्यवृत्ती तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हास्तरावर काम करतात. उमेद फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थेशी कृतीशीलपणे जोडलेल्या असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावतात.
शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून ते व्रत आहे असा विचार करून आपल्या समोरील विद्यार्थ्यांचे अध्ययन विनासायास पार पडावे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची समस्या ही आपली मानून त्या त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या राहतात. आपल्या अध्यापन कार्याशी प्रामाणिक राहून समाजभान जपणाऱ्या आणि जगणाऱ्या शिक्षिका स्मिता कोदले याना लौकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून याआधी या पुरस्काराने प्रतिभा कोतवाल, प्रफुल्ल जाधव आणि तेजस बांदिवडेकर याना सन्मानित करण्यात आले आहे.