कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता

ऍड. राजेंद्र रावराणे व ऍड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपी इरफान दाऊद शेख याने जामिनासाठी ओरोस जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे.भारुका यांनी दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजी रक्कम रुपये २५,०००/- च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने अँड. राजेंद्र व्ही.रावराणे व अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास फिर्यादी अमोल दडवते यांचे सासरे मार्याप्पा इंगळे यांच्या भंगार गोडावून मधून त्यांच्या सासर्यांच्या घरी रस्त्याच्या साईडने पायी चालत जात होते. त्यावेळी इरफान दाऊद शेख याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला त्याच्या ताब्यातील रिक्षाने भरधाव वेगात ओव्हरटेक करून ती रिक्षा फिर्यादी यांच्या एकदम जवळून घेवून गेला.म्हणून अमोल दडवते यांनी जोरात ओरडून इरफान शेख याला तुला अक्कल आहे का असे बोलले. त्याचा इरफान शेख याला राग येवून तो रिक्षा वळवून अमोल दडवते यांच्याकडे येवून थांबला व रिक्षातून उतरून दडवते यांना शिवीगाळ करून रिक्षामधील लाकडी काठीने दडवते यांच्या पाठीवर, पायावर मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत ते दोघेही रस्त्याच्या साईडला गटारात पडले. तेव्हा आरोपी इरफान शेख याने दडवते यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ चावा घेवून दुखापत करून त्यानंतर उठून बाजूलाच असलेल्या टेम्पोच्या हौद्यामधील भंगारातील लोखंडी सायलेन्सर काढून तो सायलेन्सर फिर्यादी यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली व त्याला ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद अमोल दडवते यांनी दिल्यावरून आरोपी इरफान दाऊद शेख याचे विरुद्ध भा.द.वि. कलम ३०७, ३२६,३२४,३२३,५०४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी अटक करण्यात आलेली होती.

सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचेसमोर दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी हजर केले असता त्यांना दिनांक २६डिसेंबर, २०२२ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती व तद्नंतर तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता. आरोपी इरफान दाऊद शेख तर्फे दाखल केलेल्या जामीन अर्जावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे.भारुका यांचेसमोर सुनावणी झाली. यावेळी ऍड. राजेंद्र रावराणे व ऍड. प्राजक्ता रावराणे यांनी केलेल्या युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपीस रुपये २५,०००/- च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!