राष्ट्रीय लोकअदालतीत ७८० प्रकरणे निकाली

१ कोटी ७९ लाख ८७९ रुपये तडजोड शुल्क जमा

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधून शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून तब्बल १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८७९ रुपये तडजोड शुल्क जमा झाले. न्यायालयांमधून दाखल असलेली, मात्र निकाल न झाल्याने प्रलंबित असलेली व दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने सुटावीत, यासाठी विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने या वर्षीची तिसरी अदालत २८ सप्टेंबर रोजी सर्व न्यायालयांमधून घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती एस. व्ही. कारंडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमधून या लोकअदालतीचे आयोजन केले होते. अनेक प्रकरणे या अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये ७८० प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या अदालतीत दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेश, कर्जवसुली व सर्व प्रकारची वादपूर्व प्रकरणे यांचा समावेश होता. पक्षकारांमध्ये समझोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील परस्पर सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहण्यास मदत होणार आहे. तसेच या तडजोड निकालाविरुद्ध अपिल होत नसल्याने त्यांचा पैसा व वेळ वाचला, याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ, पोलीस, शासकीय अधिकारी यांनी उत्तम सहकार्य केल्याचेही जिल्हा विधी सेवा समितीकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!