पोलीस पाटील सेवा संघ जिल्हा कार्यालयाचे कुडाळ येथे दिमाखात उदघाटन
कुडाळ (प्रतिनिधी) : तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी येथे केले.कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची खबरदारी घ्या असे त्यांनी पोलीस पाटील सेवा संघाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी सांगितले. कुडाळ सांगिरडेवाडी येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
नवनियुक्त पोलीस पाटीलांनी पोलीस पाटील सेवा संघाची स्थापना जिल्हास्तरावर केली आहे. या सेवा संघाचे कार्यालय कुडाळ येथे सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक वाघाटे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस. एल.सपकाळ, नायब तहसीलदार प्रदीप पवार, माजी सैनिक सहदेव सावंत, मंडळ अधिकारी गुरूनाथ गुरव, श्री. पास्ते, पोलीस पाटील सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील खरात, उपाध्यक्ष राजन राणे, सचिव सतीश माडये, सहसचिव दीपक गोवेकर, महिला संघटक सुवर्णा म्हाडदळकर, अमित चव्हाण, हेमंत मातोंडकर, बाबली पावसकर, वैभव धुरी आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सांगितले की, या नियुक्त्या देताना काय काय घडले हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण जो एकत्रितपणे तुम्ही लढा दिला आणि स्वतःच्या मागण्या कशा रास्त आहेत हे दाखवून दिलात त्यामुळे या नियुक्त्या तुम्हाला मिळाल्या आहेत. आता निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घ्या आणि कामाला लागा. आता तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आला आहात. त्यामुळे तुम्ही निःपक्षपातीपणे काम करणे गरजेचे आहे. जशा आम्हाला नियुक्ती देता येतात तशा त्या रद्दही करता येतात. त्यामुळे सर्वांनी सांभाळून काम करा. कोणाचीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. जुन्या पोलीस पाटीलांना आदराने हाक मारा ते सुद्धा तुमच्या कामावर प्रभावित होऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले. तर कुडाळ तहसीलदार वीरसिंह वसावे म्हणाले , संघटना महत्त्वाची आहेच. पण आपण जी सेवा हाती घेतली आहे ती सेवा प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही
याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित न राहता काम केले पाहिजे आणि आपला चेहरा निःपक्षपाती असल्याचे दाखवून दिले पाहिजे. काही कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. पण त्यामध्ये तडजोड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी प्रस्ताविक करताना प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे, नायब तहसीलदार प्रदीप पवार यांचे या भरती मधील योगदाणाबद्दल विशेष आभार मानले. तसेच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार जाधव, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी केले तर आभार सचिव सतीश माडये यांनी मानले.