ठरलंय नक्की…हॅट्ट्रिक पक्की
विशेष संपादकीय
राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : आमदार नितेश राणे हे नाव आजघडीला केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादीत राहिले नसून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आघाडीचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून अवघ्या महाराष्ट्र सह देशभरात ओळखलं जाऊ लागले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परखड सडेतोड भूमिका मांडतानाच महाविकास आघाडीच्या ठाकरे शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीवर टांगताना नितेश राणे हातचे काहीच राखून ठेवत नाहीत. राज्यात दौऱ्यावर असतानाही आपल्या कर्मभूमीत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघावर त्यांचे नेहमीच बारकाईने लक्ष असते. विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली तरीही अद्याप कणकवली विधानसभेतून महाविकास आघाडी चा आमदारकी चा चेहरा कोण ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महायुती तर्फे विद्यमान आमदार नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर होणे हा केवळ औपचारिकतेचा भाग राहिला आहे.कारण या मतदारसंघातील महायुती च्याच नव्हे तर बहुतांश जनतेच्या मनात नितेश राणे हेच उमेदवार आणि आमदार हे ठाम आहे. होय ..आम्ही हे जाणीवपूर्वक म्हणतोय की कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे नितेश राणे हे केवळ उमेदवार असणार असे नव्हे तर सलग तिसऱ्यांदा आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.एकीकडे 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आमदारकीचा उमेदवार म्हणून नितेश राणे हे आपल्या मतदारसंघात विकासकामांचा सपाटा लावत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी या मतदारसंघात पूर्णतः अंधारात चाचपडत आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील प्रबळ दावेदार असलेल्या ठाकरे शिवसेनेमध्येच उमेदवारी साठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक हे चौघेही विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आपापल्या परीने हे चौघेही विरोधी पक्ष म्हणून आमदार नितेश राणेंविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करताहेत.मात्र विधानसभेची आचारसंहिता लागली तरी यातील एकालाही याक्षणी तरी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहिर केलेली नाही. त्याचा परिणाम जो जोश , आक्रमकता आणि भारावलेपण विधानसभेचा उमेदवार म्हणून असायला हवे त्याचा पूर्ण अभाव या चारही नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून येतोय. राष्ट्रीय काँग्रेस अथवा शरद पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तर या मतदारसंघात असून नसल्यासारखा आहे. महायुती समोर महाविकास आघाडीची तूर्तास तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात नेतृत्वहीन असल्यासारखी अवस्था आहे. निवडणूक ही एखाद्या युद्धासारखीच असते. त्याची एक रणनिती असते. त्या रणनीतीची पेरणी ही ऐन युद्धाच्या तोंडावर नाही तर काही काळ आधी करावी लागते.त्यासाठी सेनापती नेमावा लागतो, सरदार तयार करावे लागतात. जे या रणनीती चा ऍक्शन प्लॅन ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. ऐन युद्धाच्या तोंडावर सैन्याची हौसलाअफजाही करणे आणि त्यांच्या मनात स्फुल्लिंग चेतवून मनोबल वाढविणे हाच युद्धकाळात विजयमंत्र असतो. पण प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने या मतदारसंघात उमेदवारीची माळ कोणाच्याच गळ्यात न टाकल्यामुळे एक प्रकारचे नैराश्य दिसून येत आहे. साहजिकच सेनापती नसल्यावर जसे सैन्य सैरभैर दिशाहीन होते तशीच अवस्था सध्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे.एकीकडे नितेश राणे यांच्याकडे पहिल्या फळीपासून ते बूथ प्रमुख पर्यंत कार्यकर्त्यांची बलाढ्य अशी वज्रमुठ आहे. अर्थात ही वज्रमुठ नितेश राणे यांनी स्वतः रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीचे आणि मतदारसंघात केलेल्या न भूतो अशा विकासकामांचे फळ आहे. नितेश राणेंचा शब्द म्हणजे काम झालेच अशी केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेची धारणा आहे. तर दुसरीकडे विरोध पक्षाकडे विधानसभेसाठी चे नेतृत्वच नसल्याने सगळा अंधार आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ जरी ठाकरे शिवसेनेच्या वाट्यालाच जाणार ही दाट शक्यता असली तरीही नेमका उमेदवार कोण असणार ? या निर्णयासाठी संभाव्य उमेदवार असलेले सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक हे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. यामुळेच आम्ही जणीवपूर्वक म्हणतोय की, होय …सलग तिसऱ्यांदा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे मोठ्या मताधिकक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.