गोवा बॉर्डरवर ९ कर्नाटक बॉर्डरवर 1 असे १० आंतरराज्य चेकपोस्ट, ७ आंतरजिल्हा चेकपोस्ट
ओरोस (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
पोलीस अधीक्षक बैठक सभागृहात अग्रवाल यांनी विधानसभा निवडणूक पूर्वतयारी याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले उपस्थित होते.
पुढे बोलताना अग्रवाल यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना निवडणुकि बाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेनंतर संपुर्ण जिल्हयात अवैध्यरीत्या दारुची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतुक होवु नये म्हणुन चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत, गोवा राज्याच्या सीमेवर ९ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर १ असे एकूण १० आंतरराज्य चेकपोस्ट आणि ७ आंतरजिल्हा चेकपोस्ट असे एकुण १७ चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. या चेकपोस्टवर दिवसरात्र बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. जिल्हयामध्ये १८ स्थायी सर्वेक्षण पचके आणि १० भरारी पथके नेमण्यात आलेली असुन तेथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
निवडणुकिच्या बंदोबस्तकरीता जिल्हयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचेसोबतच सीएपीएफ आणि एसएपीएफच्या एकुण ५ कंपनीची मागणी करण्यात आले असुन यापैकी दोन कंपन्या आज जिल्हयामध्ये हजर झालेल्या आहेत. या कंपन्या तसेच स्थानिक पोलीस, होमगार्ड यांचे रुट मार्च चे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या असुन १५ ऑक्टोबर रोजी कणकवली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या कंटेनरवर कारवाई करुन ७९ लाख रुपये किंमतीची दारु आणि ४० लाख रुपये किमतीचा कंटेनर असे एकुण एक कोटी १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच फोंडा चेकपोस्ट येथे १६ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४५ हजार ४०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या तसेच विक्री करणा- या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत असुन यात मुद्देमाल कोठुन आणला आणि कोणासाठी आणला हे सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करण्यात येत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आचारसंहिता कालावधीत अवैधरित्या दारुची वाहतुक करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करुन गोवा राज्यातील अवैधरित्या विक्री करणारे आरोपी निष्पन्न करुन त्यांचेवर कारवाई केलेली आहे आणि संबंधित आरोपीवर लक्ष ठेवणेसाठी संबंधित राज्यातील पोलीस अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.
जिल्हयामध्ये एकूण ७८ पाहिजे असणारे आरोपी व ९ फरारी आरोपी असून त्यांचा शोध घेवुन अटक करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे आणि निवडणुक कालावधीत त्रासदायक ठरणा-या एकूण ७९८ लोकांवर प्रचलित कायाद्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई कारवाई करण्यात येणार आहे, असे यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.