विकास- योजना- स्वप्न,आम्हा काय त्याचे ? जे मिळेल ते घ्यावे,अन मस्त जगावे

बहुसंख्य मतदारांचे मनोगत !

हॅट्रिक की परिवर्तन यासाठी फोंडाघाट मध्ये रस्सीखेच !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली असताना, फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये नोकरदार, कर्मचारी, व्यापारी, मजूर, शेतकरी, कामगार, व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय- गोरगरीब मतदारांचा कानोसा घेतला असता, अजूनही मतदारांमध्ये मत कोणाला द्यायचे ? यावर संभ्रम व्यक्त होत आहे. काही मतदार शासनाच्या हलगर्जीपणावर,ग्रामपंचायतच्या कारभारावर, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष बद्दल,वाढती महागाई ,कोटीच्या कोटी विकास कामातून ठेकेदारांवर मेहरनजर करणाऱ्या पोकळ आश्वासनाबद्दल, वाढती बेकारी- दादागिरी,स्वायत्त्य संस्थेचा गैरवापर यामुळे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे मतदार —विकास- योजना- स्वप्न,– आम्हा काय त्याचे?जे मिळेल ते घ्यावे,आणि मस्त जगावे. —अशा उद्विग्न भावना दबक्या आवाजात व्यक्त करताना दिसत आहेत.

कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे- भाजपा कडून तर तळागाळात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध राखून असलेला दोस्त संदेश पारकर- उबाटा शिवसेने कडून निवडणूक लढवीत आहेत .त्यामुळे मुख्य लढत महायुती आणि महाआघाडी यामध्येच आहे. दोन्ही उमेदवार फोंडाघाटच्या अत्यंत जवळचे आहेत.तरी सुद्धा आमदार नितेश राणे यांची तळागाळातील वाडी- वाडी वरील कार्यकर्त्यांची फळी, नियोजन आणि पाठपुरावा, तसेच गावातील विकास कामे यामुळे त्यांचे पारडे जड आहे. मात्र गावातील युवा- अबाल वृद्धांमध्ये संदेश पारकर कित्येक वर्ष ओळखीचे व घरातील माणूस असल्याने,दोस्तांचा दोस्त आणि “तुम्ही आमदार होणार–” या त्यांच्या आश्वासक घोषणेमुळे त्यांची टक्कर जोरदार असेल असे मतदार सांगतात . मतदारसंघात मात्र पारकर यांची तळागाळातील यंत्रणा कुचकामी दिसते. ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने ते किती मनापासून निवडणुकीचे काम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यातही पंचक्रोशीत झालेल्या अनेक कामांमध्ये ठेकेदारांनी केलेला भ्रष्टाचार, बाजारपेठेतील मुख्य रस्त्यामुळे व्यापाऱ्यांची कोंडी, जीवघेणी महागाई, लाडकी बहीण योजनेखाली आमच्या खिशातले काढून घेतलेले पैसे, आणि स्थानिक पुढाऱ्याबद्दलची नाराजी मतदार स्पष्ट बोलून दाखवतात. त्यातही शेवटच्या दोन दिवसात तमाम जनशक्ती पुढे धनशक्ती किती टिकाव धरते ? यावरच हॅट्रिक की परिवर्तन ? — कमळ की मशाल ? याचा स्पष्ट निकाल लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!