जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा उपक्रमाचा नीलम राणेंच्या हस्ते शुभारंभ
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आत्मविश्वास हा जीवनात महत्वाचा असतो. पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने व्यवसाय करावा. जिल्ह्यातील मुली महिलांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. त्यांनी पुढे येत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेवून व्यवसाय करावा, असे आवाहन जिजाऊ महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अबोली रिक्षा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील चार जणींना कर्ज प्रकरण मंजुरीचे कागदपत्र व रिक्षेची चावी देवून सौ राणे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बँक संचालक आ नितेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, सौ जठार, संचालक विठ्ठल देसाई, निता राणे, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्रकाश मोर्ये, डॉ प्रसाद देवधर, भाजप महिला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष संधा तेरसे, सायली सावंत, मेघा गांगण,रुपा रावराणे, सायली सावंत, सुप्रिया वालावलकर, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ राणे यांनी, डॉ देवधर यांची ही संकल्पना आहे. महिलांच्या दोन हाताला काम मिळाले पाहिजे म्हणून ही योजना आणली. आम्ही सर्व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे जलदगतीने निर्णय घेण्याची आम्हाला शिकवण आहे. महिलांचे राज्यातील पहिले भवन आपल्या आई नीलम राणे यांनी ओसरगाव येथे सुरू केले आहे. जिल्ह्यातील अकरा लाख लोकसंख्येत साडेपाच लाख महिला आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या दोन्ही हाताला काम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरपंच मेळाव्यात ५० टक्के महिला सरपंच दिसतात. त्याप्रमाणे रिक्षा व्यावसायिक मेळावा घेतल्यास ५० टक्के महिला रिक्षा चालक दिसल्या पाहिजेत. केवळ कर्ज मंजूर करून न थांबता पुढे हा व्यवसाय करताना काय अडचण आल्यास आम्हाला सांगा त्यासाठीही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पिंक रिक्षेसाठी अबोली रिक्षा योजनेतून कर्ज घेतलेल्या महिलांना आपल्यानंतर अन्य महिलांना या व्यवसायात येण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन केले.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी, सौ नीलम राणे यांच्याहस्ते अबोली रिक्षा कर्ज योजनेचे उद्घाटन व्हावे, ही आमची इच्छा होती. जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी महिलांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. महिलांना अधिकारवाणीने आर्थिक सक्षम करण्याचे काम जिल्हा बँक करीत आहे. प्रत्येक घराचे, व्यक्तीचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. दुग्ध व्यवसायात सुद्धा महिलांचा पुढाकार आहे. जिल्ह्यात किमान १०० पिंक रिक्षा फिरताना दिसल्या पाहिजेत. जिल्ह्याच्या उज्वल भविष्याची ही महत्वाची नांदी आहे, असे सांगितले. उपाध्यक्ष काळसेकर यांनी जिल्ह्यातील महिला रिक्षा चालविताना पाहिल्याचा क्षण मनाला भावणारा आहे. या रिक्षा चालक महिला जिल्ह्यातील महिलांच्या आयडॉल आहात, असे सांगितले. डॉ देवधर यांनी, आजचा दिवस जिल्ह्यासाठी क्रांतिकारी आहे. अर्थशास्त्राच्या परिभाषेत महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून पुरुष प्रधान संस्कृतीला उत्तर दिले आहे. घरातील महिलेला आदराने नमस्कार करण्याची संस्कृती आली पाहिजे. तरच महिला बरोबरीला आल्या, असे म्हणता येईल, असे सांगितले. तर प्रमोद जठार यांनी सिंधूरत्न विकास योजनेतून महिलांसाठी १०० टक्के अनुदानावर योजना राबविण्याचे आश्वासन दिले.