वैभववाडी (प्रतिनिधी) : बिबट्याच्या हल्ल्यात करुळ डोणावाडी येथील शेतकरी मोतीराम बाबू गुरखे यांची गाय मृत्युमुखी पडली आहे. गावात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी मोतीराम गुरखे यांनी आपली जनावरे जंगलात चारण्यासाठी सोडली होती. त्यांची इतर सर्व जनावरे सायंकाळी घरी आली. परंतु एक गाय मात्र आली नाही. गुरखे यांनी सर्वत्र शोधाशोध केली. घरापासुन अर्धा किलोमीटर अंतरावर ती गाय त्यांना मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती शेतकरी गुरखे यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला आहे. गावात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.