महिला आयोग आपल्या दारी’ जनसुनावणीत मिटली कोल्हापुरात सर्वाधिक 26 प्रकरणे
रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या सुनावण्या 156 प्रकरणांची झाली सुनावणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यायाच्या प्रतिक्षेत असणारी प्रत्येक तक्रारदार महिला, व्यक्ती न्यायासाठी मुंबईतील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात येवू शकत नाही. यासाठी ग्रामीण, शहरी भागातल्या तसेच वाड्या-वस्त्या, पाड्यांवरील पिडीत, अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा तसेच पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. तसेच आजच्या सुनावणीत 156 तक्रारी प्राप्त झाल्या असून यातील 26 केसेस या जनसुनावणीत मिटल्या असून हा आकडा राज्यात झालेल्या अन्य सुनावण्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याबद्दल अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग, विधी व प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेचे कौतुक केले.
महिलांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणी जलद न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंद शिंदे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिलांचे प्रश्न, तक्रारी, अडचणी सोडवण्यासाठी महिला आयोग कटिबध्द आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी चार पॅनेल तयार करण्यात आले आहेत. 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रमात आलेल्या शेवटच्या तक्रारदाराची तक्रार ऐकून घेवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून आवश्यक ती कार्यवाही करा, असे सांगून याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी हयगय केल्यास याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करा. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्यात याच जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम मंजूर करण्यात आला आहे. याच विचारांनी प्रेरित होवून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये असा निर्णय व्हायला हवा. एखाद्या महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या कपाळावरचे कुंकु, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, जोडवी हे सौभाग्याचे दागिने न काढता तसेच राहू दिल्यास त्या विधवा महिलेचे व पर्यायाने तिच्या मुलांचेही जगणे सुकर होईल, असे सांगून त्या म्हणाल्या, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी सर्वप्रथम समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयोग काम करीत आहे. समाजातील विधवा प्रथा, गर्भलिंग हत्या, हुंडाबळी अशा अनिष्ट गोष्टी थांबवण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून यासाठी समाजातील सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील पिडीतांच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठी महिला आयोग काम करत असून कोल्हापूर जिल्ह्यातही महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी सांगितले.
पोलीस, प्रशासन, विधी सेवा, समुपदेशक असलेल्या चार पॅनलनी जनसुनावणीत आलेल्या सर्व केसेसचा निपटारा केला. अनेक प्रकरणांमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समेट घडवून आणण्यासाठी चर्चा करुन मार्गदर्शन केले. यावेळी कौटुंबिक केसेसच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणून ही जोडपी पुन्हा सुखाने नांदण्यासाठी समुदेशन करण्यात आले. तसेच समेट घडलेल्या या जोडप्यांना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते रोप व गुलाबपुष्प देवून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आजच्या जन सुनावणीत 156 प्रकरणे प्राप्त झाली. यामधील सर्वात जास्त 115 केसेस वैवाहिक कौटुंबिक विषयाशी संबंधित होत्या. सामाजिक - 19, मालमत्ता/ आर्थिक समस्येशी संबंधित- 15 व इतर विषयाशी संबंधित 7 केसेस अशा एकूण 156 केसेस दाखल झाल्या. यातील 26 तक्रारी जनसुनावणीत सामोपचाराने मिटवण्यात यश आले.