पंचक्रोशीतील जनतेसाठी आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण होणार
खारेपाटण (प्रतिनिधी) : नडगिवे ता.कणकवली श्री गंगेश्र्वर सेवा मंडळ नडगिवे (रजि.) मुंबई या मंडळाच्या ३० व्या वर्धापन दीनाचे औचित्य साधून पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी प्रथमच या मंडळाने स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका घेतली असून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी सायं.५.०० ते ७.०० या वेळात नडगिवे गावठणवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या होणार असून या कार्यक्रमाला ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे कार्यकर्ते भास्कर राणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय… ! ” हे ब्रीद वाक्य मंडळाने मनाशी बाळगून नडगिवे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित मंडळाचे कार्यकर्ते स्वर्गवासी सुभाष तायाराम मण्यार यांच्या स्मरणार्थ जनतेसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असून आज शनिवारी सायंकाळी ही रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.ज्यांना या रुग्ण वाहिकेची गरज भासणार आहे त्यांनी आशिष उर्फ आप्पा विठ्ठल मण्यार – ८६६८४७१४२१ व शरद उर्फ भाई शांताराम सुर्वे – ९४०४१६८७८८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री गांगेश्र्वर सेवा मंडळ नडगिवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच श्री गांगेश्वर सेवा मंडळ नडगिवे (रजि.) मुंबई या मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १.०० वाजता महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व १० वी /१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री १०.०० वाजता विश्र्वकला मंच निर्मित कलाविष्कार हा बहारदार नृत्याचा सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.