खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कारवाई करा

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी , अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, खत उत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, करवीर चे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग न करता आगामी काळात जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल, असे नियोजन खत उत्पादक कंपन्या आणि कृषी विभागाने करावे. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात सर्व खतांचा मुबलक पुरवठा होईल याचीही खबरदारी घ्यावी. गुणवत्तापूर्ण खतांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांच्या तपासण्या करा. निविष्ठा केंद्रांमध्ये दर्जेदार खते, बी बियाणे व कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध होतील, तसेच निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी निविष्ठा विक्रेत्यांनी घ्यावी.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी चालू हंगामाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध सर्व खतांची माहिती दिली. जिल्ह्यात कोणत्याही खतांचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 46 हजार 757 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामध्ये 16 हजार 143 मेट्रिक टन युरिया आहे, असे सांगितले.
यापुढेही सर्व खतांचा गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल याचे नियोजन कृषी विभागाने केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम नको ;कार्यवाही करा -मंत्री आबिटकर यांनी दिल्या कृषी विभागाला सूचना

निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठकीनंतर मंत्री श्री.अबिटकर यांनी आत्मा व स्मार्ट विभागातील योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकरी व शेतीशी नाळ जोडून काम करावे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम प्राधान्याने राबवावेत. तसेच शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यात रेशीम शेती व बांबू उत्पादन, मध उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे, याचा विचार करुन रेशीम व बांबू शेती, मध उत्पादन व विक्रीला चालना देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करा. हे करत असताना कार्यक्रम घेण्याऐवजी त्या त्या योजनांची, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना ही त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!