श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा समजून घेणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ; पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे

मालवण (प्रतिनिधी) : मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.काही समस्यांचा उलगडा होतो.पण काही समस्या ह्या आपल्या आकलना पलिकडच्या असतात. त्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण जादूटोणा करणारे भोंदू बाबांकडे श्रद्धेने जातो.अशावेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये चिकित्सेची जी रेषा असते ती रेषा स्वतःमधील वैज्ञानिक दृष्टीकोनातून तपासल्यास आपली फसवणूक होणार नाही. यासाठी जादूटोणा विरोधी कायदा मनापासून समजून घ्यावा असे आवाहन मालवण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केले.

जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती – PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलिस ठाणे मालवण यांच्या पुढाकाराने मालवण तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांचेसाठी जादूटोणा विरोधी कायद्याची कार्यशाळा पोलिस ठाणे मालवण येथे आयोजित करण्यात आली होती . त्यावेळी ते विचारमंचावरून बोलत होते . यावेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर , मारुती सोनवडेकर , पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष भिकाजी परब , उपाध्यक्षा समिक्षा सुकाळी , सचिव मधुकर परब , खजिनदर दशरथ गोवेकर आदी उपस्थित होते . यावेळी विजय चौकेकर यांनी उपस्थितांना जादूटोणा विरोधी कायदा हा देवधर्मा विरुद्ध नाही . मात्र देव धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यां भोंदू लोकांसाठी हा कायदा करण्यात आला असल्याचे समजावून दिले .तसेच या कायद्यात कोठेही देव , धर्म , उपासना , श्रदधा याचाही उल्लेख नाही. हा कायदा फक्त नरबळी , इतर अमानुष , अनिष्ट . अघोरी प्रथा आणि जादूटोणा या पाच शब्दांपासून बनला असून एकूण बारा अनुसूची या कायद्यात समाविष्ट असून या पलिकडच्या कृतींना कायदा लागू नसल्याचे सांगून संतज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज यांच्या दोह्यातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक आणि कायदा समजावून दिला . भूत , भानामती , मूठ मारणे , काळी विद्या , योग , याग आणि तपश्चर्येने अलौकिक शक्ती प्राप्त होते का? मंत्राने – तंत्राने एखाद्याला मारता येते का ? या बाबत सखोल माहिती दिली . अलौकिक शक्ती आपल्यात असल्याचा कोणी दावा करीत असेल तर त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ७० लाखाचे आवाहन स्विकारण्याचे आवाहन करा . तसेच गावागावात असे कोणी जादूटोणा करताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ दक्षता अधिकारी तथा पोलिस निरीक्षक यांचे निदर्शनास आणावी असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले . यावेळी सर्व पोलिस पाटील यांना कायद्याची पत्रके वाटण्यात आली . तसेच पोलिस पाटील यांच्या मनातील भिती घालविण्यासाठी प्रात्यक्षिके ही करून घेण्यात आली . एकंदर पोलिस पाटील यांनी उत्साहाने कायदा समजावून घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!