आयुष्याच्या मध्यावर मित्र-मैत्रिणींचा स्नेह मेळावा– मर्मबंधातील एक ठेव !

बालपणीचा आठवणी हीच उर्वरित आयुष्यातील ऊर्जा — मेळाव्यातील सर्वांचे मनोगत !

फोंडा हायस्कूलच्या एसएससी १९९१ चा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मोबाईलच्या जमान्यात एकमेकांना भेटीसाठी आसुसलेल्या विचारातून, मित्र-मैत्रिणी भ्रमणध्वनी मिळू लागतात आणि मग एकत्र येऊन बालपण जगण्याची उमेद स्वस्त बसू देत नाही. त्यामध्ये सौ. सायली सुनील पवार, संजय आग्रे ,डॉक्टर हेमंत काळगे, महेश पेडणेकर, राजा शिरोडकर, अभिनंदन डोरले यांच्या अथक प्रयत्नातून तारीख- वार -ठिकाण ठरवले जाते. आणि न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या १९९१ च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात उदंड ऊर्जा देऊन जातो. आयुष्याच्या मध्यावर पोहोचलेल्या बेंच वरील चिमणी- पाखरांना गतस्मृतीची उजळणी करून देतो. प्रत्येकाचे आता बदललेले चेहरे बालपणीच्या चेहऱ्यांशी जुळवण्याचा प्रयत्न होतो. हरवलेले क्षण पुन्हा मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या विचारांची गुंफण होते आणि संसाराचे पाश,काही क्षणासाठी बाजूला सारून, निखळ हास्याने सोहळा सजविला जातो.

म्हणतात बालपणीचा काळ सुखाचा! हेच बालपण अनुभवताना कधीच रुईच्या फुलासारखा अलगद निघून. जातो. आणि आपण मोठे होतो मात्र कप्प्यात झाकून ठेवलेल्या आठवणी, अश्या सोहळ्यातून प्रत्येकाला सुखावतात. यावेळी बोलताना सायली पवार आपल्या शीघ्र काव्यात वर्णन करतात, गेले ते दिवस– ते फुलपाखरासारखं बागडण.. जीवनातील हिरवळच जणू ! सुगंधी कुप्पी ! बालपण म्हणजे मोहक गिरक्या ! उंच उंच लाटा ! स्पटिका सारखे धवलरंग ! इथे खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात. असुया नसते. किंबहुना भावी आयुष्याचा वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवाला, पूर्व तरतूद म्हणून निसर्गाने तयार केलेला शितल पाण्याचा निर्झर म्हणजेच बालपण.

तर कित्येक स्नेही आपल्या भावनांना वाट करून देताना, बालपण जेव्हा निसटू पाहत, तेव्हा जाग्या होतात त्या वेळच्या आठवणी ! आणि त्याच्या धारा आणि मन आठवणींच्या सरोवरात घुसळून जातात .वाटतं पुन्हा एकदा बालपण मिळावं आणि स्वच्छंद जीवन जगाव. मौजमजांची किलबिलाट होते. काढलेल्या कैऱ्या ,सायकलच्या टायरातून चालविलेली गाडी, विटी दांडू,चिंचोके आणि काजी- गोट्यांचा रंगलेला डाव, बॅट -बॉल, पचीचा डाव,चिंध्यांच्या बॉलची लगोरी, धावतानाची लांबच लांब साखळी ,खापरीचा चौकोनातील खेळ, आंधळी- कोशिंबीर ,— आठवणींच्या डोहात प्रत्येक जण यथेच्छ डुंबल्यावर, यातीलच काही फनीगेम मध्ये सर्वांनी त्यावेळीची मजा लुटली.

या सोहळ्यात प्रत्येकाला एकमेकांना भेटण्याची आतुरता यावेळी व्यक्त होत होती.प्रत्येक जण निखळ आनंदाचा स्वाद मिळवत होता. शेकोटी भोवती रंगलेल्या गप्पा- गोष्टी- विनोद आणि गाणी अंतर्मनाला नवी ऊर्जा देऊन गेल्या. प्रत्येक जण आपल्या व्यस्त दिनक्रमातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एकत्र येण्याची नवी उमेद व्यक्त करून, जड मनाने नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन परतीच्या प्रवासास प्रत्येक जण निघाले.या सोहळ्यातील आठवणी पुढील प्रवासात बकुळ फुलासारख्या सुगंध दरवळणारा होत्या एवढं मात्र नक्की ! किंबहुना ही मर्मबंधातील ठेव ठरावी.

error: Content is protected !!