वर्षा विद्या विलास यांची घोषणा : सिंधुदुर्ग व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. मागील वर्षभरात समितीने राबविलेले उपक्रम पाहता आगामी काळात ही समिती राज्य नशाबंदी मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत काम करेल. त्यामुळे आम्ही मार्च महिन्यात नशाबंदी मंडळाची राज्यस्तरीय दोन दिवशीय निवासी शिबिर सिंधुदुर्गमध्येच घेणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केली.
कणकवली वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्ती परिसंवाद, राज्य स्तरीय काव्य वाचन स्पर्धा रविवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक अमोल माडामे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, दोडामार्ग महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत, जिल्हा रूग्णालय मनोरूग्ण तज्ज्ञ रेश्मा भाईप, नशाबंदी मंडळ रत्नागिरीचे संघटक सचिन सुर्वे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले. आभार व्यसनमुक्ती जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार महेश सरनाईक यांनी मानले.
यावेळी प्रा. एस. एन पाटील, तंबाखू मुक्त अभियान तळेरेच्या श्रावणी मदभावे, सामाजिक कार्यकर्ते व गोपुरी आश्रम संस्था संचालक बाळू मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्ती समितीचे ॲड. मनोज गिरकर, रिमा भोसले, हर्षदा वाळके आदी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात व्यसनमुक्ती परिसंवाद तर तिसऱ्या सत्रात राज्यस्तरीय काव्य स्पर्धा झाली.
व्यसनमुक्तीसाठी नेहमीच सहकार्य करणार : सर्वगोड
आपण या जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी आलो. पण या जिल्ह्यात आपल्याला मिळालेले प्रेम आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत मिळाले नव्हते. त्यामुळे या जिल्ह्यात आगामी काळात सामाजिक दृष्टीकोनातून कार्यरत राहू. आपल्याला कधीही हाक मारा, मी तयार असेन असे आश्वासन यावेळी बांधकाम कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिले.
पर्यटन जिल्ह्यात नशेच्या प्रकारांमध्ये वाढ होण्याची भीती
नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक अमोल माडामे म्हणाले, आम्ही जे यश मिळविले, राष्ट्रपती पारितोषिक मिळाले ते तुमच्यासारख्या कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच. हा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मात्र, पर्यटन वाढत असताना नशेच्या प्रकारांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यात आपली जबाबदारी आणखीन वाढणार असून त्यादृष्टीने आपण कार्यरत राहिले पाहिजे.