उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आश्वासन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तुमचा प्रश्न मी माझा प्रश्न समजतो. तुमचा प्रश्न तुम्ही माझ्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा. कोणतेही नियम आणि कायदे कायमचे नसतात. ते बदलले जावू शकतात. त्यामुळे तुम्हाला न्याय देण्यासाठी काय करावे लागेल, ते मी करेन, असे आश्वासन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिल्यानंतर गेले १४ दिवस आमरण उपोषण करीत असलेल्या डी. एड. धारक संघटनेने काल सायंकाळी उपोषण मागे घेतले. मंत्री राणे यांच्याहस्ते पाणी पिवून हे उपोषण सोडण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर २७ मार्चपासून संभाव्य शिक्षक भरतीत डी. एड. धारकांना सरसकट संधी मिळावी, या मागणीसाठी डी. एड. धारक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले होते. महिला रात्रंदिवस हे उपोषण छेडत होत्या. बाराव्या दिवशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, डी. एड. धारक उपोषणावर ठाम होते. अखेर काल केंद्रीयमंत्री राणे यांनी भेट देत प्रश्न जाणून घेतला. यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनावर त्यांचे समाधान झाले. त्यामुळे १४ दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले.