नांदगाव (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी “अळिंबी लागवड तंत्रज्ञान” या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत धिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळिंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह, हृदयरोग इ. व्याधींनी त्रस्त लोकांसाठी आहारात अळिंबीचा समावेश फायदेशीर ठरतो. अळिंबी उत्पादन घेण्यासाठी उत्पादनाची खोली, वाळलेला चारा, अळिंबीचे बीज इ. गोष्टींची आवश्यकता असून त्यासोबतच ७५-८०% आर्द्रता व २८-३०° सेल्सियस अश्या पोषक वातावरणात अळिंबीचे दर्जेदार उत्पादन हमखास मिळते. अळिंबी उत्पादन घेण्यासाठी थोडीफार गुंतवणूक व शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन तरुण व महिला हा व्यवसाय सुरू करू शकतात. महिला बचत गटांमार्फत हा व्यवसाय सुरू केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होऊ करता येऊ शकते. सदर प्रयोग वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रा गणेश पवार, प्रा अक्षता मुरुडकर व रीना रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला असून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रतीक्षा शिरगावकर,सुजित सोनवलकर, कनक सुखी,वेदांगी पाटील, प्रियांका सुतार,अमित तलये, प्रिती तटकरे, अभिजीत ठवरे,सोनल ठोंबरे, हरिप्रिया थुपकुला, निकिता उजागरे, तन्मय वळंजू, प्राजक्ता वाळवेकर,सनी वारे, साधना वारिक, सुकन्या यादव, तुषार झांबरे, आशुतोष झेंडे, तेजस पाटील, श्रीकांत पाटील, परवेज मुलाणी, शुभम देसाई या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.