विद्यार्थ्यांची पक्षी व निसर्गाविषयी सामाजिक बांधिलकी
तळेरे (प्रतिनिधी): ऐन उन्हाळ्यात पक्षांचे पिण्याच्या पाण्या अभावी होणारे हाल आणि गैरसोय लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी झाडांना जागोजागी करवंट्यामध्ये पाणी आणि खाद्याची सोय उपलब्ध केली आहे.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे आणि निसर्ग मित्र परिवाराच्या सहकार्याने सदरचा उपक्रम विद्यालयाच्या परिसरातील झाडावरती राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे पक्षांची दानापाण्याची सोय झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच प्राणी,पक्षी यांची काळजी घेऊन आणि त्यांची गरज ओळखून खाद्य व पाणी उपलब्ध करून ती गोष्ट प्रत्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी प्रशालेत मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी विशेष पुढाकार घेतला.विद्यार्थी आणि सहकारी शिक्षक आणि निसर्ग मित्र परिवार यांच्या सहकार्याने चांगला उपक्रम हाती घेतला.विद्यार्थ्यांनी नारळाच्या करवंट्या जमा करून आणून त्या करवंट्या दोरीच्या सहाय्याने झाडांच्या फांद्यांना जागोजागी लटकवत बांधण्यात आल्या आणि त्यामध्ये पाणी व खाद्य भरुन ठेवले.पक्षांसाठी दानापाण्याची सोय उपलब्ध केली जेणे करून परिसरातील पक्षांना त्याचा निश्चितच लाभ होईल.ही सोय संपूर्ण उन्हाळ्यात राबविण्यात येणार आहे.तसेच ही संकल्पना विद्यार्थ्यांनी आपल्या घराशेजारील झाडांवरती देखील राबवायची आहे असे मत मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी निसर्ग मित्र परिसराचे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, कार्यकारणी सदस्य युवा चित्रकार अक्षय मेस्त्री, सतिश मदभावे, विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक काटे, धनलक्ष्मी तळेकर, आशा काणकेकर, काणेकर यांच्यासह इतर सहकारी शिक्षक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. सीड बॅंकेची संकल्पना राबविता येईल.परिक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरामध्ये आंबा,काजू,फणस,जांभूळ,आवळा,चिंच,रातांबा,चिकू,बदाम या फळांच्या बिया फेकून दिल्या जातात.त्या बिया विद्यार्थ्यांनी जमा करून शाळेत आणाव्यात आणि विद्यार्थ्यांनी जमा करून एकत्रित शाळेच्या सीड बॅकेत वेगवेगळ्या जमा कराव्यात.अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची एक “सीड बॅक” तयार करता येईल.त्यानंतर त्या बियांची रोपे देखील तयार करुन छोटी रोपवाटिका देखील बनविता येईल आणि तीच रोपे विकत आणून लावण्यापेक्षा त्यांचीच लागवड करुन वृक्षारोपण करता येईल.त्यामुळे झाडे खरेदी करण्यासाठी होणारा खर्च वाचेल आणि विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल.चला तर निसर्गाचे रक्षक होऊन निसर्ग मित्र बनूयात,निसर्गाशी मैत्री करुया असा संदेश यावेळी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर यांनी दिला.
निसर्ग मित्र परिवारा मार्फत निसर्ग विषयक वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन,संगोपण आणि संरक्षण व स्वच्छता तसेच कचरा मुक्त परिसर याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करीत आहे.निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्यातून विद्यालयामध्ये या वर्षी पासून निश्चितच चांगले निसर्ग विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.याची सुरुवात पक्षांना दानापाणी देण्याच्या उपक्रमापासून करण्यात आली आहे असे निसर्ग मित्र परिवाराचे सचिव राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. निसर्ग विषयक विविध उपक्रम आपल्या विद्यालयात राबविले जाऊ शकतात.त्यासाठी आमचा निसर्ग मित्र परिवार नेहमीच सहकार्य करण्यास तयार आहे. निसर्ग विषयक वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन,संगोपण आणि संरक्षण व स्वच्छता तसेच कचरा मुक्त परिसर याविषयी जनजागृती करण्याचे कार्य करीत आहे.निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्यातून विद्यालयामध्ये या वर्षी पासून निश्चितच चांगले उपक्रम हाती घेऊन ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवूयात असे मत सतीश मदभावे यांनी व्यक्त केले. शेवटी सहा.शिक्षक श्री.काटे यांनी आभार मानले.