रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर २८ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात

वैभववाडी येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला करणार मार्गदर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तसेच राज्यात रिपब्लिकन सेना – शिवसेना यांच्यात झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनिती ठरविण्यासाठी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे दि. २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून कोकण प्रदेशच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर युती केल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकार्यामध्ये उत्साही वातावरण आहे. तर यानिमित्ताने कोकण प्रदेशच्या वतीने वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते नेमके काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत रिपब्लिकन सेना कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस मिलिंद जाधव, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, प्रकाश कासे, प्रकाश करुळकर, खजिनदार सुरेश मंचेकर यांच्यासहित सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते अनिल तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळकृष्ण जाधव, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) प्रदिप कांबळे, दत्ता पवार, धनाजी जाधव, मोहन जाधव, रमेश बावडेकर, आनंद तांबे, अंकुश सकपाळ, दत्ता पवार, लक्ष्मण चौकेकर, सुरेश अरुळेकर, प्रा. वसंत विणकर अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून गेले काही दिवस महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला इतर राजकीय पक्षांतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश पाहता जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला आंबेडकरी समाजातून फार मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी येथे होत असलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी समाजासह बहुजन समाजातील सर्व मान्यवरांनी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेना कोकण प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!