ऐणारी ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी होणार

गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

वैभववाडी (प्रतिनिधी) : ऐणारी ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर सिल करून विस्तार अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण दप्तर तपासणी करण्यात येईल व यामध्ये काही तफावत आढळल्यास संबंधितार  नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी दिल्यानंतर व सभापती सिद्धेश रावराणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ऐणारी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण दुपारी साडेतीन वाजता स्थगित करण्यात आले.

ऐणारी ग्रामपंचायतीत मोठयाप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार, बेशिस्त कारभार सुरु आहे. या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. असा आरोप करीत ऐणारी गावातील ग्रामस्थ किरण विचारे, श्रीकृष्ण साईल,अमोल पांचाळ, किमया विचारे,मयुरी साहिल यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषण सुरु केले.

गटविकास अधिकारी  वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर,यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी किरण विचारे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर हे सील करून पंचायत समितीत आणून चार विस्तार अधिकाऱ्यांमार्फत या दप्तराची सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात येईल. यामध्ये काही तफावत आढळल्यास संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी श्री वाघ यांनी दिले. तर आजच्या आज दप्तर ताब्यात घेऊन ते पंचायत समितीत आणावे असा आग्रह उपोषणकर्त्यांनी केला अखेर त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली.

सभापती सिद्देश रावराणे यांनी सुद्धा दूरध्वनी वरून उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी अखेर उपोषण मागे घेतले.

दरम्यान या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख नंदू शिंदे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, जनार्दन विचारे, चंद्रकांत विचारे, बाबा मोरे, सरचिटणीस गुलजार काजी, स्वप्निल रावराणे, काँग्रेसचे दादा नेवरेकर, श्री. परब एड.अजितसिंह काळे यांनी भेट देऊन पाठींबा दिला.

error: Content is protected !!