संबंधित वयोवृद्ध महिलेने आपले काम थांबविण्याचे दिले पत्र
कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नदी किनारच्या एका गावात गेली पस्तीस वर्ष संख्याशास्त्राच्या आणि अंकशास्त्राच्या आधारे लोकांच्या विविध समस्या सोडविण्याचा आणि आजारांबाबत मार्गदर्शन करण्याचा दावा एक वयोवृद्ध महिला करीत होती. यापूर्वी त्यांची आई संख्याशास्त्राच्या आधारे लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करीत होती. आईच्या मृत्यू नंतर तिने आईकडून मिळाल्याला ज्ञानाचा व स्वतः करीत असलेल्या संख्याशास्त्राच्या, अंकशास्त्राच्या अभ्यासानुसार आलेल्या श्रद्धाळूचे भूत, भविष्य, वर्तमान कालीन समस्या ओळखून त्यावर उपाय सुचवित होती. त्यांच्या मार्गदर्शनाचा हजारो लोकांना फायदा झाल्याचा दावाही त्या करीत होत्या.
त्यांच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या सोबत मुलगा म्हणून एका कार्यकर्त्याला नेले .
माझा मुलगा B.S.C च्या शेवटच्या वर्षाला असून हल्ली तो विचित्र वागतो यावर उपाय विचारल्यानंतर मुलगा मालवण समुद्रकिनारी फिरायला गेला होता का? तेथे तो झपाटला असल्याचे सांगण्यात आले. त्याला प्रथम स्थिर करून त्याच्या परिक्षेला तो बसून त्याचे वर्ष फुकट जाऊदे नको या साठी आपण प्रथम उपाय करूया असे सांगून विविध मंत्र लिहिलेल्या चिठ्ठ्या उपाय म्हणून दिल्या. त्यानुसार तिने एका कागदावर काहीतरी मंत्र लिहून तो कागद जाळून चहातून खायला सांगितला. दुसऱ्या कागदावर मंत्र लिहून जाडसर कापडात बांधून गोमूत्र शिंपडून तीन वेळा मुलाच्या अंगावरून काढून वाहत्या पाण्यात सोडायला सांगितला. तिसऱ्या कागदावर मंत्र लिहून कपड्यात बांधून स्मशानात टाकायला सांगितलं.चौथ्या चिठ्ठीवर मंत्र लिहून जाळून त्यात गोमूत्र घालून घरात शिंपडायला सांगितला. पाचव्या कागदावर मंत्र लिहून बेल, खिळा मारून जमिनीत पुरायला सांगितला .
तसेच पूर्वजांनी सर्प हत्या केली असून ती नड तुमच्या कुटुंबाला आहे व कुटुंबाला त्याचा त्रास होत आहे. यासाठी गुळाच्या नाग करून ब्राम्हणांकडून रुद्राभिषेक करा. कासारटाका येथे तुमचे वाईट व्हावे म्हणून कोणीतरी जाप केला आहे. पेंडूरच्या सातेरी मंदिरात पंचाक्षरी मारकी जाप केला आहे. वराड येथील वेताळ देवाकडे हा जाप तुम्हाला सापडू नये असा जाप केलेला आहे. मी जे सांगितले ते खरे आहे का हे विचारण्यासाठी अमुक अमुक देवस्थानकडे जाऊन कौल घ्या आणि खरे आहे का असं विचारा. खरे आहे असे सांगितल्यास सदर केलेल्या जाप उठवायला पुजाऱ्यांना सांगावा. असे अवैज्ञानिक सल्ले दिले.
या प्रकरणी समितीने संबंधित महिलेला रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवून महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा, २०१३ आणि ड्ग्ज ॲन्ड मॅझिक रेमिडिज ॲक्ट १९५४ संबंधित कायदेशीर तरतुदींची माहिती दिली होती व आपण हा कायदा समजून घेऊन आपण करीत असलेले दावे थांबवावेत अशी विनंती केली होती. मात्र यावर काहीच तिने प्रतिसाद न दिल्याने रितसर निवती पोलीस ठाणे आणि सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांजकडे लेखी अर्ज करण्यात आला होता.
वयाचा विचार करून लेखी कबूली जबाब घेतला
पोलिसांच्या विनंतीवरून जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी निवती पोलिस ठाणेचे पोलिस हवालदार सचिन सोनसुलकर यांचे सोबत त्या महिलेच्या घरी भेट दिली. यावेळी संख्याशास्त्राच्या आधारे आजार ओळखण्याच्या दाव्यांची सत्यता पडताळण्याबाबत चर्चा झाली. संख्याशास्त्राच्या आधारे रोग निदान करण्यासाठी दहा आजारी रुग्ण आपल्या समोर उभे करतो त्यांच्या आजाराबाबत आपण योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहनही तिला अभाअंनिसने दिले. पोलिसांनी तिला ड्रग्ज ॲन्ड मॅझिक रेमिडिज ॲक्ट १९५४ आणि जादूटोणा विरोधी कायदा २०१३ समजावून दिला.
कायद्या नुसार होणारी कार्यवाही आणि भविष्यातील होणारा मनस्ताप लक्षात येताच संख्याशास्त्राच्या आणि अंकशास्त्राधा आधारे लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम आजपासून बंद करीत असल्याचे लेखी निवेदन संबंधित महिलेने दिले.
या प्रकरणात संवाद आणि कायद्याची जाणीव करून देण्याच्या माध्यमातून सकारात्मक निष्पत्ती झाल्याचे समितीने म्हटले आहे. संबंधित महिला, त्यांचे बंधू आणि पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
“आमचा विरोध कोणत्याही देव धर्माला किंवा श्रद्धेला नसून, श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या दिशाभुलीला आणि अवैज्ञानिक दाव्यांना विरोध आहे. विशेषतः आरोग्यविषयक निर्णय घेताना नागरिकांनी वैज्ञानिक वैद्यकीय उपचारांनाच प्राधान्य द्यावे,” असे सिंधुदुर्ग अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक विजय यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.










