राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीचे बांद्यात स्वागत; ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’चा रॅलीतून संदेश
बांदा (मंगल कामत) : आजची युवा पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. मात्र तरीही काही प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे. या अंमली पदार्था विरोधातील लढा ही आजच्या काळाची गरज असून भावी पिढीने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. भारत देश अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला सर्वांनी पाठबळ द्यावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बांदा येथे केले.
भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर पासून केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित मोटरसायकल रॅलीचे आज जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी या रॅलीचे बांद्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवनीत साटम, सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेश भगत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या रॅलीच्या माध्यमातून अंमली पदार्थाविरोधात जनजागृतीला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करत रॅलीत सहभागी आणि आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रातील पुढील प्रवासासाठी पालकमंत्री नितेश राणे व यावेळी बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, आबा धारणकर, जावेद खतीब, बांदा भाजप शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी सभापती गुरुनाथ धुरी आदी उपस्थित होते
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. याचवेळी भाजप युवा मोर्चा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब हे व्यासपीठाच्या खाली उभे होते. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या नजरेस जावेद खतीब पडताच त्यांनी मान्यवरांसोबत व्यासपीठावर बोलावलं.











