कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1947 च्या तृतीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई दशमहाविद्यांपैकी तारा या स्वरूपामध्ये सजली आहे.
भगवती तारेच्या अवताराच्या अनेक कथा उपलब्ध आहेत एका कथेनुसार सागर मंथनानंतर विष प्राशन केलेल्या भगवान शंकरांच्या रक्षणार्थ भगवतीने धारण केलेला अवतार म्हणजे तारा. ज्यामध्ये साक्षात शिवांनाही मातृ स्वरूपात स्तनपान देणारी देवी असं तिचं वर्णन आहे दुसऱ्या कथेनुसार हयग्रीवाच्या वधा वेळेला भगवान नारायणांना सहाय्य करण्यासाठी शक्ती प्रगट झाली ती नील वर्ण शक्ती म्हणजे भगवती तारा तर तिसऱ्या कथेनुसार प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू असणाऱ्या महर्षि वसिष्ठांनी जिची उपासना केली ते आदिशक्तीचे स्वरूप म्हणजे भगवती तारा जिने रावणवधासाठी प्रभू रामचंद्रांना सहाय्य केले.
तार म्हणजे तांत्रिक शब्दात ओमकार. या ओंकाराची शक्ती म्हणून ती तारा या नावाने ओळखली जाते हातामध्ये खपर नीलकमल खड्ग आणि कात्री धारण
करणारी तारा भक्ताला संसार सागरातून तारून नेणारी म्हणजे पार नेणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे
भगवती तारा एकजटा नील सरस्वती या नावाने सुद्धा ओळखली जाते.











