सीसीटीव्ही माध्यमातून शोध सुरू
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली बस स्थानकामध्ये एका व्यवसायिकाने स्वत:च्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी एल ई डी डिस्प्ले बोर्ड बसविला आहे.मात्र एक विकृत व्यक्ती संबंधित जाहिरातीचा मजकूर हटवून त्याऐवजी महिला प्रवाशांच्या मनात लज्ज्या निर्माण होईल, असा विकृत मजकूर टाकते. स्थानकातील सीसीटीव्ही तपासून या विकृत प्रवृतीच्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या संदर्भात कणकवली पोलिस ठाण्यातही कल्पना देण्यात आली आहे. येथील बस स्थानकात पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण हे गेली ४२ वर्षें अक्षय पाॅपकाॅर्न स्टाॅल या आस्थापनांचे परवानाधारक आहेत. त्यांनी ८ महिन्यांपूर्वी पाॅपकाॅर्नच्या जाहिरातीसाठी एल ई डी डिस्प्ले बोर्ड बसविला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत ३ ते ४ वेळा या बोर्डाच्या तांत्रिक बाबीची माहिती असणारी एक विकृती प्रवृतीची व्यक्ती डिस्प्ले बोर्ड चालू असताना मुळ जाहिरातीचा मजकूर हटवून त्याऐवजी महिला प्रवाशांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचा मजकूर टाईप करतो. ही बाब लक्षात येण्यास वेळ लागला तर तो मजकूर महिला पुरुष प्रवाश्यांच्या नजरे खालून जातो. त्यामुळे परवानाधारकाच्या सामाजिक प्रतिमेस धक्का बसत आहे. प्रवाशांचा मनात गैरसमज निर्माण होत आहे. तसेच असा अश्लील मजकूर काढून त्याऐवजी परत मुळ मजकूर डिस्प्ले वर टाकणे तांत्रिकदृष्ट्या कटकटीचे काम होत आहे. तसेच मुळ मजकूर टाकल्यानंतरही ही विकृत प्रवृतीची व्यक्ती पुन्हा विकृतीपणा करण्याचा धाडस वारंवार करीत असते. या संदर्भात चव्हाण यांनी कणकवली पोलिस ठाण्याला कल्पना दिली आहे.