कुडाळ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे अभिनंदन करण्यात आले. पीआय मगदूम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हिर्लोक येथील अघोरी पूजेचा प्रकार प्रत्यक्ष जागेवर जाऊन तात्काळ उघडकीस आणला. जादूटोणा आणि काळी विद्येच्या साहित्यासह पाचही आरोपींना अटक करून जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याबद्दल त्यांचे व त्याच्या सर्व पोलिस सहकारी यांचे अभिनंदन करावे यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले’ जिल्हा संघटक विजय चौकेकर’ जिल्हा सचिव अजित कानशिडे ‘कुडाळ तालुकाध्यक्ष समीर कुलकर्णी’ उज्वला येळावीकर, प्राध्यापक संतोष चौघुले संत राऊळ महाराज कॉलेज, ॲड. सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी मगदूम यांना अभिनंदनाचे पत्र तसेच जादूटोणाविरोधी कायद्याची प्रत आणि श्याम मानव सरांचे पुस्तके भेट देण्यात आले. यावेळी आवळेगाव दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाचही आरोपींकडे चौकशी करून सदरचा प्रकार जादूटोणा कायद्यांतर्गत अघोरी होत असल्याचे निदर्शनात येतात तात्काळ त्यांनी राजेंद्र मगदूम यांच्या निदर्शनात आणले आणि त्यांची पोलीस मदत आल्यानंतर पाचही आरोपांना अटक करण्यात महत्त्वाची भूमिका वटविली. त्यामुळे त्यांचेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पत्र देऊनअभिनंदन करण्यात आले. त्यांनाही शाम मानव सरांची पुस्तके भेट देण्यात आली. याचबरोबर सदर झालेला प्रकार याची जनजागृती व्हावी यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण दिल्यास गावागावात घडणाऱ्या अशा घटना तात्काळ निदर्शनास येतील यासाठी त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देण्याची ही मागणी केली. राजेंद्र मगदूम साहेब यांनी तात्काळ सहमती दर्शवून पुढील पोलीस पाटील यांच्या बैठकीत जादूटोणाविरोधी कायद्याचे मार्गदर्शन करण्याची हमी दिली. हिर्लोक आंबेडकर नगर येथील घरात केलेली साहित्याची मांडणी आणि खोदलेल्या खडड्याची लांबी रुंदी आणि खोली पाहता हा खड्डा नरबळीच्याच उद्देशाने खोदला असल्याचे समितीने आपले ठाम मत व्यक्त करून त्या दृष्टीने आरोपी आणि पडद्यामागील अजून कोणी साथीदार असल्यास त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केला. पण म्हणावा तसा जिल्ह्यामध्ये प्रसार प्रचार झालेला नाही. यासाठी सर्वांनी जागृत राहून असे कृत्य कुठे घडत असेल तर ते तात्काळ समितीच्या अथवा तेथील पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणावे असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात येत आहे.