सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी
उपनगराध्यक्षांचे सभेत भाजपा नगरसेवकांना समर्थन
देवगड (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाच्या ठरावावरून व मागील सभेत सत्ताधा-यांनी विरोधकांच्या विकासकामाचा बहुमतावर रद्द केलेला ठराव या दोन विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीने देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाच्या ठरावावरून १० मिनीटासाठी नगराध्यक्षांनी सभेचे कामकाज स्थगित ठेवले.पाणी व कचरा, स्वच्छता या प्रश्नांसाठी विशेष सभा घ्यावी अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली. देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी संतोष जिरगे, स्वच्छता समिती सभापती विशाल मांजरेकर उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला इतिवृत्त वाचन सुरू असताना इतिवृत्तामध्ये दि. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमधील अभिनंदनाचा ठराव दोन महिन्यांनी आताच्या सभेत इतिवृत्तामध्ये का आला? इतिवृत्तात फेरफार केला आहे असा आरोप नगरसेविका प्रणाली माने यांनी केला. फेब्रुवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष व पक्षाचे चिन्ह दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव विरोधी नगरसेवकांनी घेतला होता मात्र दोन महिन्यांनी एप्रिलच्या सभेत ठरावाची माहिती इतिवृत्तामध्ये का आली. मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाच्या ठरावाबाबत मतदान घ्या अशी मागणी विरोधी नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरूल,अरूणा पाटकर व भाजपा नगरसेवकांनी केली मात्र ठरावाबाबत मतदान घेण्यास नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी नकार दिली. यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.अभिनंदनाच्या ठरावाच्या बाजुने भाजपा नगरसेवकांनी हात उंचावले. यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनीही त्यांच्या बाजुने हात उंचावून समर्थन केले मात्र मतदानास नकार दिला व याबाबत सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी १० मिनीटे सभा स्थगित ठेवण्यात आली. यानंतर अभिनंदनाच्या ठरावाबाबत सत्ताधारी नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भुमिका घेतली तर भाजपा नगरसेवकांनी बहुमताने ठराव घ्यावा अशी मागणी केली. त्याचबरोबर इतिवृत्तामधील क्रमांक १२ च्या विरोधकांची विकासकामे सत्ताधा-यांनी नामंजुर करण्याचा ठरावावरून विरोधी नगरसेविका प्रणाली माने यांनी नगराध्यक्षांना या ठरावाबाबत मतदान घ्या अशी मागणी केली.यावरून पुन्हा सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.विरोधक मतदान घ्यावे या मागणीवर ठाम राहीले तर सत्ताधा-यांनी मतदान घेणार नाही.मागील सभेतील ठरावावर मतदान घेण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगून सत्ताधारी नगरसेवक नितीन बांदेकर, संतोष तारी, तेजस मामघाडी यांनी जोरदार विरोध केला.या ठरावाबाबतही विरोधी भाजपा नगरसेवकांनी आमच्याकडे बहुमत असल्याने मागील सभेत सत्ताधा-यांनी विरोधी नगरसेवकांची विकासकामे नामंजुर करण्याचा ठराव रद्द करावा अशी मागणी केली. देवगड जामसंडेमधील पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाण्यासाठी कोणते नियोजन केले याची माहिती द्यावी अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली.कच-याचा प्रश्नही गंभीर असून सफाई कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन, स्वच्छतेचा प्रश्न या दोन्ही विषयांसाठी विशेष सभा घ्यावी अशी मागणी केली.आकांक्षी स्वच्छतागृह जागा निश्चिती करून जामसंडे येथे करण्यात यावे अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली. देवगड येथील शुक्रवार आठवडा बाजारामध्ये तृतीयपंथी लोकांकडून बाजारात आलेल्या महिलावर्गाला त्रास देण्यात आला याबाबत न.पं.प्रशासनाकडून पोलिसांना पत्र देवून कारवाई करावी अशी मागणी माने यांनी केली.