श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे करणार परिक्षण
कुडाळ (प्रतिनिधी): श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राधाकृष्ण चषक 2023’ या संगीत उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित ‘शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी दुपारी ठीक ०३ वा. श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव, ता. सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी श्रीमती मंजिरीताई आलेगावकर करणार असून यावेळी त्या शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. मंजिरी ताईंचे वडील पं. मोहन कर्वे हे गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य आणि उत्तम गायक कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर गायकीचे, शास्त्रीय संगीताचे संस्कार झालेत. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक आणि संगीत समीक्षक कै. पं. वामनराव देशपांडे यांची खास जयपूर घराण्याची तालीम त्यांनी अनेक वर्षे घेतली. तसेच कै. अप्पा कानिटकर, पं. हळदणकर यांचेही बहुमुल्य मार्गदर्शन त्यांना मिळाले. संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांवर मंजिरीताईंनी मैफिली गाजविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सवाई गंधर्व महोत्सव, स्वर-झंकार, गानवर्धन पुणे, आय.एन.टी. चंदीगड, स्वरविलास बडोदा, आकाशवाणी संगीत संमेलन, सरस्वती समाज दिल्ली, नादब्रह्म चेन्नई इ. अनेक मैफिलींचा समावेश आहे. दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा इ. ठिकाणीही त्यांच्या मैफीली झालेल्या आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या त्या टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत.मंजिरी ताईंना भारतरत्न पं. भीमसेन जोशींच्या हस्ते ‘कुमार गंधर्व पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेले आहे. सोबतच अनेक संस्थांच्या विविध पुरस्कारांच्या त्या विजेत्या आहेत. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अशा या विख्यात कलाकार या स्पर्धेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग येथे येत असल्याने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी आहे. तरी सर्व संगीत प्रेमींनी व शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या संस्थापिका सौ वीणा दळवी यांनी केले आहे.