खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार आणि वंचितांना माणूस म्हणून सन्मानजन्य जीवन जगता यावे, यासाठी ‘जीवन आनंद’ यासारख्या अनेक संस्था अविरतपणे झटताहेत. हे काम वाखण्याजोगे असून गोवा राज्य हे जागतिक आनंद अहवालात अग्रेसर आहे. “तसेच गोव्यातील रस्त्यांवर आढळणारे ९९ टक्के निराधार हे मूळचे गोंयकार नाहीत. तरीही सभोवतालच्या प्रदेशांतील निराधार, वयोवृद्ध तसेच इतर वंचित बांधवांना आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यानुसार मानव सेवेसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांना सरकारचे नेहमीच सहकार्य राहिल, असे आश्वासन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात दिले.
शुक्रवारपासून ‘जीवन आनंद संस्था’ आणि सारस्वत शिक्षण संस्थेचे काकुलो वाणिज्य महाविद्यालयाने संयुक्तपणे रस्त्यावरील निराधार लोकांच्या समस्येवर राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसीय परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादाच्या उद्घाटन सत्रानंतर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, फलोत्पादन महामंडळाचे चेअरमन प्रेमेंद्र शेट, सारस्वत शिक्षण संस्थेचे सचिव रुपेश कामत हे व्यापसीठावर होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, मानव सेवेसाठी काम करणऱ्या बिगर सरकारी संस्थांना सरकारकडून अर्थसहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे, प्रत्येक अनाथ मुलांसाठी सरकारकडून महिन्याकाठी तीन हजार रुपये मदत दिली जाते. तळमळ असल्याशिवाय जीवन आनंद संस्थेसारखी जनसेवा होऊच शकत नाही.
सध्या सरकारकडून मूल्यवर्धित शिक्षणाचे धडे दिले जातात. कारण, पुढील पिढीला वसुदैव कुटुंबकम् ची शिकवण देणे खूप गरजेची आहे. अनेकजण वडिलधाऱ्याना ओझे समजून घरातून हाकलून देतात. हे योग्य नाही, परिणामी त्यांना निराधारासारखे रस्त्यावर जीवन कंठावे लागते, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली.”
मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता !
जीवन आनंद संस्थेचे संदीप परब म्हणाले की, मानसोपचार रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सध्या मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता आहे. पंढरपूर यात्रेनंतर किंवा आश्रमाबाहेर अनेकजण वृद्धांना सोडून देतात. त्यामुळे निराधारांच्या संख्येत भर पडते. तसेच इस्पितळाबाहेर ही वंचित मंडळी आढळतात. हे नियंत्रणात येण्यासाठी सर्वांची जबाबदारी असून जीवन आनंद याच हेतूने काम करीत आहे.
देशभरातील 40 प्रतिनिधी
हा परिसंवाद १२ व १३ मे रोजी सारस्वत शिक्षण संस्थेच्या आनंद केणी सभागृहात संपन्न झाला.यात देशातील सहा राज्यातून सुमारे ४० प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिसंवादात रस्त्यावरील निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
“सध्या मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे. ही समस्या जगाला भेडसावते. त्यामुळे युवकांना मानसिक आरोग्याविषयी जास्त शिक्षित व जागृत करणे गरज बनली आहे.”
- जोशुआ डिसोझा, उपसभापती
“प्रत्येकाने जबाबदारीने वागून घरातील मंडळींना सन्मानाने वागणूक द्यावी. विभक्त कुटुंबाच्या नावाने घरातील व्यक्तींना बाजूला केले जाते. हे सभ्यता किंवा संस्कृतीचे दर्शन नाही.”