निलेश राणेंनी दोन वेळा नियोजित बैठक रद्द केल्याने मा.आ. वैभव नाईक यांचा तहसीलदारांना टोला
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यासाठी मालवण तहसीलदार यांनी दोन वेळा आमदार निलेश राणेंची वेळ घेऊन आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र सलग दोन्ही दिवशी आमदार निलेश राणेंनी बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे ऐनवेळी सांगितल्याने सलग दोन्ही दिवशीच्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दुष्काळाचा काळ असताना मालवणच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या पाणी टंचाईच्या बैठकीला उपस्थित राहायला जर आमदार निलेश राणेंना जमत नसेल तर पाणी टंचाईची बैठक आता आमदार निलेश राणेंच्या मुंबईतील बंगल्यावर घेण्यात यावी जेणेकरून सिंधुदुर्गात येण्याचा त्यांचा त्रास कमी होईल. असा टोला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तहसीलदारांना लगावला आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या यादीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुढील काळात नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आताच नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेंना त्याचे अजिबात गांभीर्य नाही. मालवण तहसीलदार यांनी आमदार निलेश राणेंची वेळ घेऊन पाणी टंचाईची पहिली बैठक काल ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली होती. लेखी पत्राद्वारे त्याचे निमंत्रण सर्व संबंधित अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांना देण्यात आले होते. परंतु निलेश राणेंनी ऐनवेळी आपल्याला या दिवशी उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगून ती बैठक रद्द करण्यास सांगितली. आणि आज दुसऱ्या दिवशी ०९ ऑक्टोबरला बैठक घेण्यास सांगितले. त्यामुळे तहसीलदारांनी पुन्हा पत्रव्यवहार करून ०९ ऑक्टोबरला बैठक होणार असल्याचे जाहीर केले. परंतु आजही निलेश राणेंनी सकाळी ९ वाजता ऐनवेळी बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे तहसीलदारांना कळविले त्यामुळे आजची ०९ ऑक्टोबरची बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. आणि रद्द झालेल्या बैठकीची सूचना व्हाट्सएपद्वारे मेसेज करून कळविण्यात आली. सलग दोन्ही दिवशीच्या बैठका रद्द झाल्याने बैठकीसाठी उपस्थित राहणारे संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचा दोन वेळा वेळ वाया जाऊन भ्रमनिरास झाला. मालवणच्या पाणी टंचाईचे योग्य वेळी नियोजन होणे त्याचबरोबर त्यासाठी भरघोस निधी मंजूर करून नवीन जलस्त्रोतांची निर्मिती करणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी आमदार महोदयांची आहे. अन्यथा मालवण मध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. असे मा. आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.











