सव्वा वर्षापासून पोलिसांना गुंगारा; तुळजापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : चोरी, घरफोडी आणि संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्यात सव्वा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत संशयिताला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तुळजापूर (जि. धाराशिव) येथून शिताफीने ताब्यात घेतले. राहुल सुनील भोसले (वय २७, रा. धनेगाव, ता. तुळजापूर) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, गोव्यातील खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी आणि घरफोडी अशा आणखी तीन गुन्ह्यांतही तो पोलिसांना हवा होता. त्याला सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात १० जुलै २०२५ रोजी चोरी, घरफोडी आणि अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संघटित गुन्हेगारीचे स्वरूप समोर आल्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ चाही समावेश करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित राहुल भोसले हा गुन्हा दाखल झाल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध लागत नव्हता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले आणि त्यांच्या पथकाने संशयिताचा सातत्याने माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे तो मूळ गावी धनेगाव परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तुळजापूर गाठून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास धनेगाव परिसरात त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, हवालदार ओटववणेकर, पोलिस अंमलदार अमर कांडर आणि समजिस्कर यांचा सहभाग होता.
गोव्यातील तीन गुन्ह्यांतही हवा संशयित राहुल भोसले याच्याविरुद्ध गोव्यातील विविध पोलिस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल आहेत. पेडणे पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि वाहनचोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. तसेच ओल्ड गोवा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या तिन्ही गुन्ह्यांतही तो पोलिसांना हवा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी केलेल्या या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.











